बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन? आणखी तिघांना अटक

| Updated on: Oct 23, 2024 | 10:40 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पुण्यातून आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींची कटात सहभागी असल्याची पुष्टी झाल्यानंतर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात धागेदोरे आणखी कुठपर्यंत जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन? आणखी तिघांना अटक
Follow us on

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. रुपेश मोहोळ, करण साळवे आणि शिवम कोहाड या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केलीये. पुण्यातल्या उत्तम नगर आणि शिवणे परिसरातुन या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हत्येच्या कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही अटक करण्यात आलीये. तीनही आरोपी १९ ते २२ या वयोगटातले आहेत. निर्मल नगर गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने पुण्यात ही कारवाई केली आहे.

शिवणेमधून रुपेश राजेंद्र मोहोळ, वय 22, उत्तम नगरमधून करण राहुल साळवे, 19 वर्ष आणि शिवम अरविंद कोहाड, वय 20 यांना अटक करण्यात आलीये. या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना अटक करण्यात आलीये.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आजच ११ व्या आरोपीला पोलिसांनी हरियाणामधून अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा आणखी तिघांना अटक करण्यात आली असून आता आरोपींची संख्या १४ झाली आहे.

बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तर एक शूटर फरार झाला होता. पोलिसांची टीम वेगवेगळ्या राज्यात जावून धागेदोरे तपासत आहे. या हत्येची जबाबादारी जरी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानंतर सलमान खानच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आली होती. कारण लॉरेन्स बिश्नोई गँगकडून याआधी सलमान खानला बऱ्याचदा धमक्या आल्या आहेत. सलमान खानच्या सर्व कुटुंबाला पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या सलमान खान सोबतच्या जवळीकतेमुळे झाल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई गँगने केला होता.

सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी. सलमानने माफी मागितली तर त्याला सोडून दिलं जाईल असा दावा देखील लॉरेन्स बिश्नोई गँगने केला होता.