अभिजित पोते, पुणे | 14 मार्च 2024 : पुणे लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस असलेले मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपने पुण्याची जबाबदारी दिली आहे. मुरलधीर मोहोळ यांच्याबरोबर लोकसभेसाठी जगदीश मुळीक यांचंही नाव चर्चेत होतं. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे जगदीश मुळीक काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचवेळी जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली भूमिका व्यक्त केली आहे. त्या पोस्टला भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना लाईक केले असून शेअर केली आहे.
पुणे लोकसभेसाठी भाजपमध्ये अनेक जण इच्छुक होते. अनेकांनी भावी खासदार म्हणून बॅनर्स लावले होते. त्यात मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यात उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाली होती. यामुळे नुकतीच जगदीश मुळीक यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवींस यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली होती. त्या चर्चेचा तपशील मात्र बाहेर आला नव्हता. आता जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.
जगदीश मुळीक यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कोणतेही पद नसताना माझ्यासाठी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम पाहता मी कायम कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद.” जगदीश मुळीक यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे. पक्षावर निष्ठा कायम ठेवल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतूक केले आहे. भविष्यात आपल्यालाही उत्तम संधी मिळणार आहे, हा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.