पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे आणि मुंबई शहराचा विकास करण्याकडे केंद्र शासनाने लक्ष दिले आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्यासाठी महाराष्ट्राचा वाटा महत्वाचा असणार आहे. यामुळे या शहरांचे सकल राष्ट्रीय उत्पादन वाढवून त्याच्या विकासासाठी योजना तयार केली जात आहे. आगामी सात वर्षांसाठी ही योजना असणार आहे. 2030 पर्यंत मुंबईचे सकल राष्ट्रीय उत्पादन 300 बिलियन डॉलर करण्यात येणार आहे. पुण्यासाठी अशीच योजना आहे. देशातील 20 शहरांची यादी नीती आयोगाने केली असून त्यात मुंबई आणि पुणे शहराचा समावेश असणार आहे.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत पुढील सात वर्षांत पुणे, मुंबई शहराचा आर्थिक विकास वेगाने करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला. पुढील चार महिन्यात हा आरखडा तयार होणार आहे. तसेच राज्य सरकारने योजनाच्या अंमलबजावणीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 ट्रिलियन डॉलरचे उद्दीष्ट महाराष्ट्र कसे गाठणार यासंदर्भात माहिती दिली. राज्यातील सकल राष्ट्रीय उत्पादन वाढवून आपणास 1 ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. यामुळे देशाला 5 ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल. नीती आयोगानुसार, पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र हे उद्दिष्ठ गाठू शकते.
कुशल कामगार, पायाभूत सुविधा, रस्ते विकास, समृद्धी एक्स्प्रेससारख्या योजना यामुळे राज्याचा विकास चांगला होणार आहे. यामुळे राज्यात औद्योगिक आणि ऑटोमोबाईल उद्योग मोठ्या प्रमाणवर येतील अन् राज्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. राज्यातील पुणे, मुंबईसह देशातील 20 शहरांची निवड करुन त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पादन वाढवण्यात येणार आहे. देशातील जीडीपीचा 70 टक्के वाटा शहरांमधून येणार आहे. यामुळे शहरांच्या विकासावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी सांगितले.