पुणे | 8 सप्टेंबर 2023 : ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यानंतर हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार गुरुवारपासून राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मुंबईमध्ये जोरदार पाऊस होत आहे. पुणे शहर आणि घाटमाथ्यावर चांगला पाऊस सुरु झाला आहे. घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पवना धरण पूर्ण भरले आहे. यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.
पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पवना धरण पूर्ण भरले आहे. यामुळे गुरुवारी धरणातून 1,500 क्यूसेक पाणी सोडले गेले. परंतु पाण्याचा जोर वाढल्यामुळे 3,500 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नद्यकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या लोणावळ्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. लोणावळ्यात 24 तासांत 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी कमी होती. आता खूपच कमी कोसळल्यानं चिंता मात्र कायम आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई उपनगरच्या कांदिवली, बोरिवली मालाड अनेक भागात सकाळपासून पाऊस सुरू आहे. मुंबई शहर परिसरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडली. पावसाचा कोणताही परिणाम उपनगरी रेल्वेवर झालेला नाही.
कल्याण, डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले आहे. ठाणे शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. महिन्याभरानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठात वाढ होणार आहे. यामुळे मुंबईकरांना आता दिलासा मिळाला आहे. मुंबईवरचे पाणी कपातीचे संकट कमी झाला आहे.