पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना उमेदवार कोण असणार ? याबाबत उलट सुलट चर्चा पुण्यात सुरू आहे. त्यातच कोणीही स्पष्ट उमेदवारी बाबत बोलून दाखवलं नसलं तरी अनेक नेते इच्छुक असल्याचं दबक्या आवाजात बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपमधून कोण असणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
दोन पंचवार्षिक पासून पुण्याची खासदारकी भाजपकडे आहेत. गिरीश बापट यांच्यापूर्वी अनिल शिरोळे हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यानंतर गिरीश बापट हे पुण्याचे खासदार झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही जागा कायम आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप शर्तीचे प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे.
पुण्यामधून खासदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. अनेकांचे बॅनरही भावी खासदार म्हणून झळकले आहेत. तर अनेक जण हे छुपा प्रचार गेल्या अनेक वर्षांपासून करत असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवार कोण असणार ?याबाबतची चर्चा आता पुण्यात जोर धरू लागली आहे.
याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान पुणे लोकसभा पोटनिवडणूक उमेदवार कोण असणार ? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे लोकसभेबाबत तूर्तास मी चर्चा घडवणार नाही, तुम्ही ही घडवू नका असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. पुण्यातील भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे कुटुंबीय अद्याप दुःखातुन सावरलेलं नाही.
त्यामुळं पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत तुम्ही काहीही चर्चा करू नका. मी ही अशी कोणती चर्चा करणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार याचं उत्तर गुलदस्त्यातच राहणार आहे.
गिरीश बापटांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण असेल? अशी चर्चा पुणे लोकसभेत रंगलेली आहे. त्या चर्चांना बावनकुळे यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे असे म्हणता येऊ शकेल.
तर दुसरीकडे पुणे लोकसभेच्या संदर्भात पोटनिवडणूक जाहीर होईल की नाही. याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.