नाशिक : खरंतर कोरोना संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत असतांना भारतातील पुणे सर्वाधिक चर्चेत होते. मग ते रुग्णांच्या संख्येवरून असो नाहीतर मग उपचाराविना होणाऱ्या मृत्यूवरून असो. मात्र या पेक्षाही सर्वाधिक चर्चेत आले होते सीरम इंस्टिट्यूट. सीरम इंस्टिट्यूट कोरोना काळात संजीवनी ठरलेली कोविशील्ड लस तयार करण्यात आली होती. येथे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती. आणि त्यानंतर जगभरात कोविशील्ड लसीचा साठा करण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुणे जगभरात चर्चेत होते. मात्र, याच पुण्यात आता नव्याने चर्चा होऊ लागली आहे ती म्हणजे जिथे उत्पादन आहे तिथे लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नाहीये. त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा होत आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोरोना लसी संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कोर्बेव्हॅक्स लसींचा साठा उपलब्ध नाही त्यामुळे कोरोना वाढत असतांना लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे.
कोव्हॅक्सिन लसीचे 800 ते 1000 डोस मुदतबाह्य झाले आहेत, त्यामुळे शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पुणे महानगर पालिकेच्या दवाखान्यांमध्ये 1 एप्रिलपासून लस उपलब्ध झालेली नाही अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
पुढील लसीकरणासाठी पुणेकरांना किमान आठ दिवस वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे आठ दिवस पुण्यातील लसीकरण ठप्प राहणार आहे. खरंतर लसीकरण करून घ्या असं वारंवार आवाहन केले जात असतांना नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
कोरोना पुन्हा येत असल्याने ज्या नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. ते नागरिक आता लसीकरण केंद्रांची चौकशी करत लसीकरण घेण्यासाठी धावाधाव करत आहे. त्यामुळे लसीकरणाची अचानक वाढलेली मागणी बघता आरोग्य विभागाचाही गोंधळ उडाला आहे.
ज्यावेळी सरकारच्या वतीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे यासाठी आवाहन केले जात असतांना नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली. मात्र अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आणि लसीकरण ज्यांचे झाले आहे त्यांना त्याचा फार धोका नाही असे सांगितले जात असतांना लसीकरण न झालेले नागरिक लसीकरण केंद्रावर विचारणा करत आहे.
एकूणच सध्याची मागणी पाहता आणि उपलब्धता बघता कमीतकमी आठ दिवस लस उपलब्ध होण्यासाठी कालावधी जाणार आहे. एकूणच अचानक निर्माण झालेली ही स्थिती आरोग्य विभागात चर्चेचा विषय ठरत असून पुण्यात याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.