पुणे शहरातून कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता त्यांच्यासाठी वरंध घाट बंद करण्यात आला आहे. भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. वरंध घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली.
वरंध घाटात रस्त्याचे दुपदरीकरणं, संरक्षक भिंत बांधणे तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असताना अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव 1 एप्रिल पासून 30 मे पर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु लग्नसराई तसेच उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुक पाहता कोकणात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून घाटातील रस्ता सुरु करण्याची मागणी महाडचे आमदार भारत गोगावले यांनी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबतच झालेल्या चर्चेनंतर 1 मे पासून काही दिवसांकरीता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा एकदा घाटाीतल कामे सुरू करण्यात आल्याने हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी वरंध घाट हा शार्टकट मार्ग होतो. परंतु आता फेऱ्याचा मार्ग वाहनधारकांना वापरावा लागणार आहे. वाहनधारकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरावा.
शनिवारी १८ मे आणि रविवारी १९ मे रोजी पुणे मुंबई एक्सप्रेस दीड तासांसाठी बंद राहणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायेववरील ओव्हरहेड ग्यांट्रीच्या तांत्रिक तपासणीसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सकाळी 10.30 ते दुपारी 12 पर्यंत मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद राहणार राहणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बंद दरम्यान सर्व वाहतूक जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.