मनोज गाडेकर, अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी दोन हजाराच्या नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला. पहिली नोटबंदी झाल्यानंतर कोट्यावधीच्या जुन्या नोटा साई संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. त्या घटनेला सहा-सात वर्षे झाली आहेत. या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहारही झाला. परंतु त्या नोटा अजूनही पडून आहे. यामुळे भाविकांनी दानपेटीत ३० सप्टेंबरनंतर दोन हजाराच्या नोटा टाकू नये, असे आवाहन शिर्डी संस्थानला करावे लागले आहे.
काय घेतला गेला निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवण्याचे सांगितले आहे. आता दोन हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबर २०२३पर्यंत वैध राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे. त्यानंतर त्या नोटा घेतल्या जाणार नाही.
त्यानंतर 31 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्वीकारण्यात आल्या किंवा बदलून देण्यात आल्या, परंतु या घटनेला पाच वर्ष उलटून देखील अद्यापही शिर्डी साई संस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) दानपेटीत जुन्या नोटांचा ओघ सुरूच आहे. साई दर्शनाला येणारे भक्त दान पेटीमध्ये जुन्या ज्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत त्या टाकत असल्याचे आढळून आले आहे. कोट्यावधीच्या जुन्या नोटा साई संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. दरम्यान याबाबत आता काही महिन्यांपासून भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. दरम्यान आता आरबीआय या नोटांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साई संस्थांनकडून निवेदन
साईभक्तांनो ३० सप्टेंबरनंतर दोन हजारच्या नोटा दानपेटीत टाकू नका, असे आवाहन शिर्डी साई संस्थानने केले आहे. ३० सप्टेंबर पर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारच्या नोटा स्वीकारणार आहे. त्यानंतर त्या स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील नोटबंदीच्या काळातील 3 कोटी रुपयांच्या नोटा पडून आहेत. यामुळे हा निर्णय घेतला असल्यानं साई संस्थानने म्हटले आहे. 30 सप्टेंबरनंतर दोन हजारच्या नोटा न टाकण्याचे आवाहन साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांनी केले आहे.
केंद्रीय पातळीवर पाठपुरावा
साईबाबा संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आहेत. विशेष म्हणजे नोटबंदीला सहा ते सात वर्षे उलटली तरी आजही दानपेटीतील या जुन्या नोटांची आवक थांबलेली नाही. जुन्या नोटा दानपेटीतील पैशांची मोजदाद करताना आढळून येतात. गेल्या 5 वर्षांत दानपेटीत पडणाऱ्या या नोटांनी साई संस्थानची डोकेदुखी वाढवली आहे. संस्थानकडून याचा पाठपुरावा केला जात आहे. परंतु अजून त्याला यश आले नाही.
दोन हजार रुपयांची नोट कधी आली चलनात?
भारत सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता. त्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता. रात्री 12 नंतर 500 आणि 1000 रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात 500 आणि नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरु केली होती.