योगेश बोरसे, पुणे | 4 नोव्हेंबर 2023 : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसला. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपामुळे 129 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे वित्तहानी प्रचंड प्रमाणात झाली आहे. नेपाळमधील जजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भाग भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. नेपाळमध्ये महिन्याभरात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. नेपाळमधील भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले. उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतातील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान नेपाळमध्ये पर्यंटनासाठी पुणे येथील 39 प्रवासी गेले होते. त्यांनाही भूकंपाचे धक्का जाणवले. हे सर्व जण सुखरुप आहेत.
पुणे येथील 39 प्रवासी नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. पुण्यातील अर्चीस इंटरनेशनल टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून हे सर्व जण नेपाळ दर्शनासाठी गेले होते. हे सर्व पुणेकर चितवन जवळील सौरह येथील रॉयल सफारी या हॉटेलमध्ये थांबले होते. 3 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11.55 वाजण्याच्या सुमारास सर्व जण हॉटेलच्या रूममध्ये होते. त्यावेळी त्यांना अचानक बेड हलू लागल्याची जाणीव झाली. त्यानंतर सर्व प्रवासी हॉटेलच्या इमारतीमधून सौरा वैरा पळत बाहेर आले. एका मोकळ्या जागेत सर्व जमा झालेत.
पुणे येथील नेपाळमध्ये गेलेल्या सर्वांना भूकंपाच्या धक्काची जाणीव झाली. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर 6.4 भूकंप आल्याचे त्यांना बातम्यांमधून कळाले. त्यानंतर अनेकांनी घरी फोन लावून आपल सुखरुप असल्याचे कळवले. या सर्व जणांचा आज नेपाळमधील ट्रीपचा शेवटचा दिवस होता. हे सर्व जण पहाटे तीन वाजता नेपाळमधून निघाले. गोरखपूरवरुन शनिवारीच ते पुण्याला दाखल होणार आहे.
दरम्यान नेपाळमधील या भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरे पडली आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. जगभरातून नेपाळाला मदत सुरु झाली आहे.