अभिजित पोते, पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | चेन्नईवरुन पुणे शहराकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. रात्री जेवण करुन झोपलेल्या प्रवाशांना त्रास होऊ लागला होता. यामुळे या प्रवाशांवर औषधोपचार करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सर्व 40 प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
चेन्नईवरून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. मध्यरात्रीच्या सुमारास ही रेल्वेगाडी पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली. पुणे रेल्वे स्थानकातच सर्व प्रवाशांना उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात ठेवले होते. रेल्वे स्थानकावर प्राथमिक उपचार केल्यानंतर ४० प्रवाशांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेल्वे मंत्रालयाने आता गाड्यांमध्ये पेन्ट्री कार ठेवली नाही. भारत गौरव यात्रा ही रेल्वे चेन्नईहून पुणे शहराकडे येत होती. गाडीत पेन्ट्री कार नसल्यामुळे खानपान सुविधा नाही. यामुळे प्रवाशांना ताजे अन्न मिळत नाही. वेंडरकडून अनेक वेळा सकाळचे फुड रात्री दिले जाते. त्यामुळे ही विषबाधा झाल्याची शक्यता आहे.
चेन्नईवरून पुणे शहराकडे येणाऱ्या भारत गौरव रेल्वेतील प्रवाशांना जेवणानंतर त्रास सुरु झाला. त्याची माहिती पुणे रेल्वेस्थानकावर देण्यात आली. मध्यरात्री रेल्वेगाडी पुणे रेल्वे स्थानकावर दाखल होणार होती. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय पथक तैनात ठेवले होते. गाडी पुण्यात येताच रेल्वेतील प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. रेल्वे स्थानकावर डॉक्टरांची टीम सज्ज होती. त्यानंतर ससूनमध्ये प्रवाशांसाठी ४० बेड तयार ठेवले होते. सर्वांना प्राथमिक उपचार केल्यानंतर ससूनमध्ये दाखल करण्यात आले. सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहे.