पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर एका वाहनातून 5 कोटींची रोख रक्कम जप्त, ‘ती’ गाडी कुणाची?

| Updated on: Oct 21, 2024 | 11:07 PM

पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात पोलिसांनी एका गाडीतून जवळपास 5 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. पोलिसांनी गाडी आणि काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.

पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर एका वाहनातून 5 कोटींची रोख रक्कम जप्त, ती गाडी कुणाची?
पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर एका वाहनातून तब्बल 5 कोटींची रोख रक्कम जप्त
Follow us on

पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. या नाकाबंदी दरम्यान खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना संबंधित गाडीतून किती रोख रक्कम मिळाली आहे? याबाबतचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही. पण माहितीनुसार, या गाडीत पोलिसांना जवळपास 5 कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे. ही गाडी एका बड्या नेत्याची तथा विद्यमान आमदाराची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या वाहनात नक्की किती रक्कम होती हे अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र या वाहनात मोठी रोख रक्कम असल्याचे बोलले जात आहे. या रक्कम कोणाची? कुठे चालवली होती? आदीबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरु आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहन पोलिस चौकीला आणून त्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली. तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या खेड-शिवापूर पोलीस चौकीत वरिष्ठ पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. या वाहनातील रक्कमेची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे.