पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहर औद्योगिक शहर आणि शैक्षणिक केंद्रही आहे. यामुळे शहरात रोजगार आणि शिक्षणासाठी राज्यभरातून विद्यार्थी आणि तरुण आलेले आहेत. दिवाळी दरम्यान अनेक जण आपल्या गावी जात असतात. दिवाळीत गावी जाणाऱ्यांच्या होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. तसेच खासगी बसेसचे दर दुप्पटीपेक्षा जास्त असतात. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना एसटीचा मोठा आधार असतो. आता एसटीने सर्वसामान्य प्रवाशांसाठी चांगले नियोजन केले आहे. दिवाळी दरम्यान शेकडो एसटी बसेस पुणे शहरातून सोडण्यात येणार आहे. यामुळे वाजवी दरात लोकांना घरी जाऊन दिवाळी साजरी करता येणार आहे.
पुणे शहरातून विविध ठिकाणी दिवाळी दरम्यान बसेस सोडण्यात येणार आहे. पुण्यातून तब्बल ५०० गाड्या अधिक सोडल्या जाणार आहेत. पुण्यातून मराठवाडा, खानदेश, विदर्भात जाण्यासाठी एसटी विभागने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे येथील शिवाजीनगर आगरप्रमुखांकडून ज्यादा बसेसच नियोजन करण्यात आले आहे. खडकी कँटनमेंट येथून बसेस सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून एसटीकडून नियोजन करण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीसाठी ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागासह राज्यातील इतर विभागातून जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेला पर्याय म्हणून एसटी राहणार आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्सकडून होणाऱ्या दरवाढीमुळे जादा भाड्याचा भुर्दंड बसणार नाही.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी चांगला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने दिवाळीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळी पूर्वीच जमा होणार आहे. राज्य परिवहन महामंडळातील तृतीय आणि चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन 43,477 पेक्षा कमी आहे, त्या कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये देण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.