मावळ, पुणे: कासारसाई धरणावर (Kasarsai Dam) कुटुंबासह फिरण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Drowning death) झाल्याची घटना घडली आहे. प्रद्युम्न गायकवाड असं बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आज रविवारची सुट्टी असल्याने गायकवाड कुटुंबीय पिंपरी-चिंचवडच्या वाकड (Pimpari Chinchawad Wakad) परिसरातून मावळातील या धरणावर फिरायला आले होते. त्यावेळी प्रद्युम्न गायकवाड हा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी उतरला होता. मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. प्रद्युम्न त्याचे आई, वडील, भाऊ, बहीण असे सात जण कासारसाई धरणावर फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर तातडीने स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरु करण्यात आले. यावेळी शिवदुर्ग रेसक्यू टीम यांच्या पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
गेल्या काही दिवसातील ही चौथी ती पाचवी घटना आहे. त्यामुळे धरणावर पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीसांनी सावधनतेचा इशारा दिला आहे. तसेच पाटबंधारे विभागानेही पाण्यात न उतरण्याच्या सूचना देऊनही काही लोक अतिउत्साहात पाण्यात उतरत असल्यामुळे बुडून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
प्रद्युम्न आपल्या आई वडिलांसह पर्यटनासाठी सगळे कुटुंबीयच धरणावर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी प्रद्युम्नला पोहण्याची इच्छा झाल्याने तो धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी उतरला मात्र त्याला बॅक वॉटरचा पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे तो बुडाला. तो बुडत असताना कुटुंबीयांनी जोरदार आरडाओरड केल्याने धरणाच्या परिसरात असलेल्या नागरिकांनी प्रद्युम्न बुडत असलेल्या पाण्याकडे धाव घेतली मात्र त्याआधीच तो पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.
तो पाण्यात बुडाल्यानंतर स्थानीक नागरिकांच्या मदतीने शिवदुर्ग रेसक्यू टीमला पाचरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पाच तास अथक परिश्रम करुन प्रद्युम्नचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी घटनास्थळी आलेल्या शिरगाव-परंदवडी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगांव येथे पाठवला असून या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.