पुणे : छोटू हा कामगार म्हणून काम करतो. काम करता करता तो ठेकेदार झाला. त्याने आधी विहिरी खोदण्याचे काम केले. त्यानंतर तो स्वतः ठेके घेऊ लागला. तो स्वतः कामगारही होता आणि ठेकेदारही. विहिरीच्या बांधकामासाठी छोटूने ठेका घेतला. इतर मजुरांना सोबत घेऊन विहीर खोदली. विहिरीला रिंगण लावले. बांधकामासाठी बांबूचा सपोर्ट घेण्यात आला. पण, हे बांबू काढत असताना धक्कादायक घटना घडली.
बांबू काढत असताना छोटू अचानक विहिरीत पडला. विहिरीला पाणी लागले होते. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे विहिरीत बुडून तो गटांगळ्या खाऊ लागला. आजूबाजूची लोकं जमा झाली. त्यांनी छोटूला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. पण, शेवटी छोटूचा मृतदेहच त्यांना सापडला.
आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील गाढवे मळ्यात विहिरीचे रिंग टाकण्याचे काम सुरू होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर रिंगच्या आतील बाजूचे बांबू काढताना दुर्घटना घडली. कामगार विहिरीत पडल्याची घटना घडली. यामध्ये कामगार ठेकेदाराचा मृत्यू झाला.
काम पूर्ण झाले असल्याने दुपारी 4 च्या दरम्यान रिंगच्या आतील बाजूचे बांबू काढत असताना छोटू विहिरीत पडला होता. विहिरीत 25 ते 30 फुटावर पाणी असल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती कळताच पारगाव पोलीस टीम, स्थानिक ग्रामस्थ यांनी शोध कार्य सुरु केले आहे.
विहिरीत पाणी उपसा करण्यासाठी मोटर लावण्यात आली होती. अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे छोटूच्या कुटुंबावर दुःखाचे सावट कोसळले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न छोटूच्या कुटुंबापुढं पडला आहे. छोटू कमावता असल्याने त्याचे कुटुंब चालत होते. ते आता उघड्यावर आले आहे.
छोटू नेहमीप्रमाणे कामासाठी गेला होता. त्याच्यावर असे संकट ओढवेल अशी कुणालाही कल्पना नव्हती. पण, छोटीशी चूक त्याला महागात पडली. जीवावर बेतल्याने आता छोटूचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे.