मुंबई | 29 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्कार समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाला शरद पवार प्रमुख पाहुणे राहणार आहेत. शरद पवार या कार्यक्रमाला येणार असून त्यांनी याबाबत शब्द दिल्याचं लोकमान्य टिळक यांचे वंशज रोहित टिळक यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे 1 किंवा 2 ऑगस्टला राज्यसभेत दिल्लीचं विधेयक येण्याची शक्यता आहे. यावेळी शरद पवार यांनी उपस्थित राहून विधेयकाविरोधात मतदान करावं, असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलंय. त्यामुळे शरद पवार यांच्यापुढे नवा पेच निर्माण झालाय.
राज्यसभेत 1 किंवा 2 ऑगस्टला राज्यसभेत दिल्लीचं विधेयक येण्याची शक्यता आहे. या विधेयकाला ‘आप’कडून जोरदार विरोध करण्यात आलेला आहे. विरोधकांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा, अशी विनंती अरविंद केजरीवाल यांनी केली. शरद पवार यांनी पुण्यातल्या कार्यक्रमाला जाऊ नये. सभागृहात उपस्थित राहून विरोधात उपस्थित राहून विरोधात मतदान करावं, असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
शरद पवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पुण्यात थांबणार की अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिल्लीला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शरद पवार, नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच मंचावर एकत्र येणार असल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. कदाचित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय-काय घडतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते एकाच मंचावर दिसले तर ते एकमेकांशी काय बोलतात? त्यांची बॉडी लँग्वेज काय म्हणते, ते एकमेकांना आपल्या भाषणातून टोले-टोमणे मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार यांची नुकतीच मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आता काहीही झालं तरी भाजपविरोधात एकत्र सामना करायचा, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच राज्यात 15 ऑगस्टनंतर शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एकत्रित जाहीर सभा होण्याची शक्यता आहे.