योगेश बोरसे, पुणे : अजित दादांनी (Ajit Pawar) भाजपच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल मागे घेतलं खरं. पण या सगळ्या शक्यता वर्तवणाऱ्यांवरही ते भयंकर चिडले. खुद्द संजय राऊतांनाही (Sanjay Raut) सोडलं नाही. राजकीय जाणकार मात्र अजूनही आपल्या आडाख्यांवर ठाम आहेत. तर राजकारणातील अनेक नेते मंडळीदेखील नव-नवीन भाकितं वर्तवत आहेत. पुण्यातूनही एक अशीच टिप्पणी आली आहे. राजकारणातील सद्यस्थितीवर बोचरी टीका करणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी सध्याच्या परिस्थितीवर थेट भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील शीतयुद्धावरच त्यांनी बोट ठेवलंय. जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना तुरुंगात जावं लागू शकतं, अशी शक्यता देवेंद्र फडणवी यांनी व्यक्त केली होती. मग अचानक पहाटेचा शपथविधी कसा झाला, असा सवाल बिचुकले यांनी केलाय, तेसुद्धा त्यांच्या खास स्टाइलमध्ये..
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्यावर जलसिंचन घोटाळ्यावरून जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र सरकार स्थापनेची वेळ आली तेव्हा असं काय घडलं, यावरून बिचुकले यांनी सवाल केला. ते म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस म्हणत होते जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग,चक्की पिसिंग मग पहाटे का केलं किसिंग, असा सवाल बिचुकले यांनी केलाय.
अभिजित बिचुकले यांनी नुकताच कसबा पेठेतील विधानसभा पोट निवडणुकीत सहभाग घेतला होता. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या निवडणुकीत बिचुकले यांच्या उपस्थितीने रंगत आणली होती. बिचुकले यांना दोन अंकी मतदानाचा आकडाही गाठता आला नाही. मात्र मी आता नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 2024 मध्ये माझा पक्ष 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आणि 125 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार, असा दावाही बिचुकले यांनी केलाय.
अजित पवार यांच्या मनात महिलांबद्दल किती सन्मान आहे, हे त्यांच्या एका वक्तव्यावरूनच दिसतं. नारायण राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी राणेंना एका महिलेनं पाडलं.. बाईनं.. बाईनं.. असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून अभिजित बिचुकले यांनी ही टीका केली.
माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा, अशी मागणी पुन्हा एकदा अभिजित बिचुकले यांनी केली. मुख्यमंत्र्यांना त्यांना याआधी तसं पत्रही लिहिलं होतं. ती राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री असेल, असंही बिचुकले म्हणाले.
तर अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भवनाला छत्रुती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी नवी मागणी बिचुकले यांनी केली आहे. या आशयाचं एक पत्र नुकतंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दिलंय.