Pune News : मध्यरात्री कार रस्ता चुकली अन् 40 फूट खोल दरीत पडली

| Updated on: Aug 13, 2023 | 11:35 AM

Pune News : पुणे येथून भोर वरंध घाटमार्गे रायगडला निघालेली कार रस्ता चुकली. त्यामुळे 40 फूट खोल दरीत पडली. मध्यरात्री झालेल्या आवाजामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी, क्रेन नसतानाही मदत कार्य राबवले.

Pune News : मध्यरात्री कार रस्ता चुकली अन् 40 फूट खोल दरीत पडली
Follow us on

विनय जगताप, भोर, पुणे | 13 ऑगस्ट 2023 : पुणे येथून भोर वरंध घाटमार्गे रायगडला कार निघाली होती. मध्यरात्र असल्यामुळे कार चालकास रस्ता समजला नाही. कारचालक रस्ता चुकला. यामुळे ती कार सुमारे 40 फूट खोल दरीत पडली. मध्यरात्रीच्या सुमारास कुडली खुर्द‌‌‌ गावाजवळ हा अपघात झाला. रात्रीचा काळोख आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला. कार पडल्याचा आवाज आल्यानंतर मध्यरात्रीच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु आंधारामुळे मदतकार्य राबवता आले नाही.

कसा झाला अपघात

पुणे शहराकडून निघालेला कारचालक भोर मार्गे महाडकडे जात होते. त्यांची चारचाकी गाडी रात्रीच्या वेळी रस्ता चुकली. त्यांनी हिर्डोशी मार्गे जाण्याऐवजी निगुडघर येथून नीरा देवघर रिंगरोड मार्गे धरणाला वळसा घेतला. रात्रीची वेळ आणि धुकेही होते. त्यामुळे कारचालकास रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे त्यांची गाडी ४० फूट खोल दरीत जाऊन कोसळली.

ग्रामस्थ धावले अन् मोहीम राबवली

कोकणात जाण्यासाठी भोर मार्ग जवळचा आहे. हा मार्ग जवळचा असल्यामुळे वाहन धारक या मार्गानेच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. तसेच या मार्गावर चोरी, लुटमारीच्या घटना घडत नाही. यामुळे रात्रीचा प्रवास करताना भीती वाटत नाही. शुक्रवारी मध्यरात्री अडीच्या सुमारास एक चारचाकी वाहन (एमएच १२ एफवाय ५८०९) जात होते. परंतु त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. तसेच रस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक नव्हते. यामुळे चालक रस्ता चुकला अन् त्याची गाडी 40 फूट खोल दरीत पडली.

हे सुद्धा वाचा

ग्रामस्थांनी राबवली मोहीम

मध्यरात्री गाडी पडल्याचा आवाज आल्यामुळे ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी गाडीतील प्रवाशी सुखरुप असल्याची खात्री केली. त्यानंतर हा भाग दुर्गम असल्यामुळे क्रेन, जेसीबीची सोय नव्हती. शेवटी सर्व कुडली ग्रामस्थांनी एकीचे बळ दाखवले. गावात असणारे दोर, लोखंडी तारा आणि मनुष्यबळ वापरुन गाडी ढकलत रस्त्यावर‌ काढली. मार्गावर दिशाफलक नाही. यामुळे आंबेघर आणि निगुडघर येथे नेहमी वाहन धारकाची दिशाभूल होते. यामुळे या पद्धतीचे अपघात होत आहेत.