शिरुर, पुणे : नगर-पुणे महामार्गावर कारेगाव लगत फलके मळा येथे मंगळवारी रात्री अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवर मृत्यू झाला. मृतांमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीचा सामावेश आहे. अपघातात कार चालवणारे अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) गंभीर जखमी झाले आहेत. परंतु त्यांचे आई, वडील, पत्नी व मुलीसह चौघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
कसा झाला अपघात
सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे या अपघातात जखमी झाले. ते कार चालवत होते. त्यांच्यावर कारेगावमधील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
मेहुण्याच्या लग्नासाठी येणार होते पाहुणे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह कारने (एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते.
दुपारच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनर (एमएच ४३ बीजी २७७६) वर त्यांची कार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ब्रह्मा पवार, संतोष औटी, विलास आंबेकर या पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी क्रेनच्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली मोटार बाहेर काढली व स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतू पोलिसांनी क्रेन च्या सहाय्याने मोटार व अपघातग्रस्त कंटेनर हलविल्याने वाहतूक सुरळीत झाली.
कारचा चक्काचूर
अपघातात कारचा चक्काचूर झाला, तर मोटारीत अडकून सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यू झाला. कार्तिकी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मोटार चालवित असलेले अश्विन भोंडवे हे देखील जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ कारेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.