पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक हॉटेल्स मनपाच्या रडारवर आले आहेत. नेहमी वेगवेगळ्या पदार्थ्यांच्या चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या हॉटेल्सवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कारवाई केली जात आहे. पुणे येथील आलिशान पद्धतीच्या असलेल्या ‘रुफटॉप हॉटेल्स’वर कारवाई केली जात आहे. मनपाकडून या हॉटेलसंदर्भात आक्रमक भूमिका घेत सरसकट कारवाई करण्याचे धोरण अवलंबले गेले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु असलेले एकही रुफटॉप हॉटेल अधिकृत नाही. यामुळे पिंपरी चिंचवडमधील नऊ हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड मनपाने केलेल्या पाहणीत शहरात 49 रुफटॉप हॉटेल्स आहे. या हॉटेल्स सुरु करताना बांधकामाची परवानगी घेतली गेली नाही. अग्नीशमन दलाची परवानगी नाही. या हॉटेल्समधील आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच या हॉटेल्समुळे कोट्यवधी रुपयांचा कर बुडत आहे. त्यामुळे महापालिकेने या हॉटेल्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 9 रुफ टॉप हॉटेल्सवर महापालिकेने हातोडा चालवला आहे.
पुणे शहरातील वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाईन रोड, भोसरी, आकुर्डी या भागांत रुफटॉप हॉटेल सुरु झाले आहेत. कोणतेही परवानगी न घेता किचन तयार करुन इमारतीच्या गच्चीवर हॉटेल सुरु करण्यात आले आहेत. या हॉटेल्सला मनपाकडून नोटीस बजावण्यात होती. त्यानंतर हॉटेल बंद झाल्या नाहीत. यामुळे मनपाने कारवाई सुरु केली आहे. वाकड परिसरात सर्वाधिक 19 रुफटॉप हॉटेल्स आहेत.
पुणे येथील अनेक रुफटॉप हॉटेल्समध्ये बार आहेत. हे बार रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांच्या आवाजाचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असतो. बार असल्यामुळे कधीकधी भांडणे होतात. हॉटेलमध्ये गाणे सुरु असतात. त्या आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी दिल्या आहेत. शहरात किचनसह सुरु असलेली एकही रुफटॉप हॉटेल अधिकृत नसल्याची माहिती मनपाचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी दिले.