तुमचे बंद वाहन रस्त्यावर पडून आहे का? उचलून घ्या, अन्यथा होणार अशी कारवाई

| Updated on: Jul 17, 2023 | 2:52 PM

Pune News : रस्त्यांवर अनेक दिवसांपासून बेवारस पडलेली वाहने किंवा रस्त्यावर अडथळा ठरणारे वाहन उचलून घ्यावे लागणार आहे. ही वाहने न उचलल्यास दंडासोबत मोठी कारवाई होणार आहे. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय.

तुमचे बंद वाहन रस्त्यावर पडून आहे का? उचलून घ्या, अन्यथा होणार अशी कारवाई
Follow us on

पुणे | 17 जुलै 2023 : अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर बंद पडलेली वाहने किंवा बेवारस पडलेले वाहन एक मोठी समस्या असते. ही वाहने वाहतुकीसाठी नेहमी अडथळा ठरत असतात. परंतु वाहन मालक त्याकडे लक्ष देत नाही. आपल्या वाहनास हक्काची जागा मिळाली, असा समज त्यांचा झालेला असतो. परंतु आता रस्त्यावर पडलेल्या वाहनांविरोधात कारवाई होणार आहे. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

काय घेतला निर्णय

पुणे शहरातील रस्त्यावरील बंद वाहने सात दिवसांच्या आत हटवा, असे निर्देश पुणे महानगरपालिकेने दिले आहे. ही वाहने न हटवल्यास महापालिका प्रशासनाकडून २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. पुणे शहराच्या अनेक मध्यवर्ती भागात त्याचप्रमाणे उपनगरांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी बेवारस वाहने आहेत. अनेक महिने ही वाहने पडून आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. बंद असलेल्या वाहनांच्या जवळपास नागरिकांकडून कचरा टाकला जातो. त्यामुळे शहर स्वच्छ राहत नाही तसेच दुर्गंधी पसरत आहे. यासंदर्भातील तक्रारी पुणे महानगरपालिकेकडे सातत्याने येतात.

आधी नोटीस नंतर अशी कारवाई

पुणे महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस वाहनांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. या वाहनांवर महापालिका प्रशासनाकडून नोटीस चिकटवण्यात येणार आहे. त्यानंतर सात दिवसांत ही वाहने न हटवल्यास ती जप्त केली जाणार आहेत. तसेच दंडही केला जाणार आहे. गेल्या वर्षी याच मोहिमेअंतर्गत महापालिका प्रशासनाने वर्षभरात १२०० वाहने जप्त केली होती.

हे सुद्धा वाचा

ही आहे परिस्थिती

बेवारस वाहने अनेक दिवसांपासून पडलेली आहे. ही भंगार अवस्थेतील वाहने असल्यामुळे वाहन मालक लक्ष देत नाही. वर्षानुवर्ष ही वाहन एकाच ठिकाणी असल्यामुळे परिसरात झाडेझुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. या परिसरात प्लास्टिक कचरा, मद्याच्या बाटल्या, माती, खडी, वाळूचे ढिगारे साचलेले असतात. त्यासंदर्भात तक्रारी मनपाकडे येत असतात. परंतु आतापर्यंत कारवाई होत नव्हती.