योगेश बोरसे, पुणे, 15 डिसेंबर | ‘पुणे तेथे काय उणे’ असे नेहमी म्हटले जाते. कारण पुणेकर नेहमी वेगळच काही करतात. त्यांचा यशाचा झेंडा देशात नाही तर जागतिक पातळीवर रोवला जातो. आता पुन्हा पुणेकरांनी करुन दाखवले. पुणेकरांच्या नावावर जागतिक विक्रम झाला आहे. यापूर्वी चीनचा नावावर असणारा विक्रम पुणेकरांनी मोडला आहे. एकच वेळी तीन हजार ६६ पालकांनी आपल्या मुलांना गोष्टी सांगितल्या. आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा चीनचा नावावर असलेला विक्रम गुरुवारी भारताच्या नावावर झाला. पुणे महानगर पालिकेच्या पुढाकरातून आयोजित या उपक्रमाची नोंद विश्वविक्रम म्हणून होताच ढोल-ताशांचा गजर आणि देशभक्तीपर गीतांवर एकच जल्लोष झाला.
पुणे मनपा आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव सुरु आहे. ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आणि ‘पुणे महानगरपालिका’ आयोजित ‘बालक-पालक’ हा गोष्ट सांगण्याचा सामूहिक कार्यक्रम गुरुवारी घेण्यात आला. यावेळी पालकांची आणि मुलांची मोठी गर्दी झाली होती. यामध्ये एकाच वेळेस आपल्या मुलांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. ‘शांतता…पुणेकर वाचत आहे’ हे अभिनव अभियाननुसार तीन हजार ६६ पालकांनी मुलांना गोष्टी सांगितल्या. यापूर्वी २०१५ मध्ये चीनमध्ये २ हजार ४७९ मुलांना पालकांनी गोष्टी सांगण्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता. क्षिपा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करु नका पुस्तकातील गोष्ट सांगण्यात आली त्यावेळी गिनिज बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर मैदान वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांनी परिसर दणाणला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुणे येथील विश्वविक्रमाचे कौतूक करण्यात आले. पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट सांगण्याबाबत पुण्यात नोंदवल्या गेलेल्या विश्वविक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. वाचनाचा आनंद पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.