सागर सुरवसे, सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचा वाद सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपण युतीसाठी राजीनामा द्यायला तयार असल्याचं वक्यव्य केले. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांनाच निवडून आणण्याचा दावा त्यांनी करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा दुसरा वाद समोर आला आहे.
आता कुठे सुरु झाला वाद
कल्याणनंतर आता सोलापूर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपामध्ये धुसफूस सुरु आहे. शिंदे गटाच्या नेत्यांना भाजपाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यांसह भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वेळ देत नाहीत. आमची कामे करीत नाहीत. फक्त भाजपच्या लोकांची कामे होतात. भाजपाकडून शिवसेनेवर अन्याय सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी प्रसार माध्यमासमोर केलाय. त्यामुळे सेना भाजपामधली धुसफूस समोर आली आहे.
कल्याणमधील वाद काय होता
डोंबिवली मानपाडा येथे डोंबिवली पूर्व भाजप मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर भाजप कार्यकर्ते अन् पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. मानपाडा पोलीस ठाण्याचे सीनियर पीआय शेखर बागडे भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत करत नाही, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांची बदली करण्याची मागणी केली. या बैठकीत शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
त्यानंतर जोपर्यंत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होणार नाही, तोपर्यंत शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करणार नाही, असा ठराव करण्यात आला. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेला मदत करायची नाही, असा ठराव झाल्याने श्रीकांत शिंदे संतापले. मग त्यांनी युतीसाठी आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले.
सोलापूर वादावर बावनकुळे काय बोलणार
कल्याणमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वावनकुळे यांनी केला. तो वादा अजूनही कायम असताना सोलापूरमधील वाद समोर आला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेची कामे होत नाही, असा आरोप करत शिंदे गट बाहेर पडला होता. आता पुन्हा शिवसेनेकडून सोलापुरात तोच आरोप केला जात आहे. यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.