योगेश बोरसे, पुणे | 11 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीत रवाना झाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया विचारली असता माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांना विचारले असता, त्यांनी ‘दिवाळीच्या शुभेच्छा’, अशी दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली. परंतु अजित पवार अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी का गेले? हा प्रश्न राज्यात चांगलाच चर्चेला गेला. नवी दिल्लीत अमित शाह आणि अजित पवार यांच्यात ४० मिनिटे खलबते झाले. त्यानंतर रात्री १२ वाजता अजित पवार पुण्यात दाखल झाले.
शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट झाल्यानंतर अजित पवार काल दुपारी 2 वाजता पुणे विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले होते. अजित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी साधारण ४० मिनिटे अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली. या भेटीनंतर रात्री पावणे बारा वाजता पुण्यात दाखल झाले. अमित शाह यांना भेटून आल्यानंतर अजित पवार आता बारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या पाडाव्याच्या कार्यक्रमास जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चढउतार येत असतात. आयुष्यात अडचणी येत असतात. सर्व प्रकारच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. या सर्व संकटाचा विसर करून आनंदाने दिवस जगावे, अशी इच्छा असणार दिवस म्हणजे दीपावली होय. मी महाराष्ट्रातील जनतेला हा दिवाळीचा सण आनंदाने जावा त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी लाभावी, अशी शुभेच्छा देतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.