पुणे : पुण्यातल्या चांदणी चौकात वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी साताऱ्यावरून मुंबईला जाताना चांदणी चौकातील वाहतुकीची पाहणी केली. चांदणी चौकामध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा (Traffic jam) सामना गेली अनेक महिने पुणेकरांना करावा लागत आहे. मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर काल पुण्यात याच प्रश्नावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर चांदणी चौकातील (Chandani chowk) पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल पाडल्यानंतर वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री चांदणी चौकातून साताऱ्याकडे जात असताना मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागले. तर स्थानिकांनी त्यांचा ताफा अडवत वाहतूककोंडीविषयी निवेदनही दिले होते.
चांदणी चौकातील कामाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर याठिकाणी आता कामाला सुरुवात झाली आहे. चांदणी चौक परिसर हा पुण्यातील वाहतूककोंडी असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. मुंबईकडे जाणारी तसेच मुंबईकडून येणारी याशिवाय शहरातील वाहतूकही याठिकाणी पाहायला मिळते. जी वाहने शहराबाहेर जातात, ती अरुंद जागेमुळे कोंडीत अडकतात. या कोंडीमध्ये जेव्हा खुद्द मुख्यमंत्री अडकले, तेव्हा त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. त्यानुसार येथील पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. 12 ते 15 सप्टेंबरदरम्यान हा पूल पाडला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार काम सुरू झाले आहे. तर लगेचच नवीन पूल बांधण्याच्या कामालाही सुरुवात होणार आहे.
उद्यापासूनच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसराची पाहणी केल्यानंतर दिली आहे. त्यासाठी मनुष्यबळ अधिक लागणार आहे. याचे नियोजन केल्याचे, सर्व संबंधित विभागाशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. चौकात काम सुरू असल्याने मुंबईकडून येणाऱ्या एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी यावेळी झाली होती. आता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. वाहतूककोंडीतून स्थानिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.