पुण्यातल्या अपघातानंतर विरोधकांनी तिघांना घेरलं, दिशाभूल केल्याचा आरोप

| Updated on: May 22, 2024 | 10:10 PM

पुण्यातल्या कार दुर्घटनेनंतर विरोधकांनी तीन जणांचा घेरलं आहे. ज्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पोलीस आयुक्त आणि अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या समावेश आहे. पुणे कार दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातल्या अपघातानंतर विरोधकांनी तिघांना घेरलं, दिशाभूल केल्याचा आरोप
Follow us on

पुण्यातल्या अपघातानंतर आता विरोधकांनी तिघांना घेरलं आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरेंना सवाल केले जात आहेत. तर कलम 304 लावण्यावरुन धंगेकरांनी गृहमंत्री फडणवीसांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. भाजपनं मात्र आरोप फेटाळलाय. पुण्यातल्या अपघातानंतर, तिघांवर विरोधकांनी भडीमार केलाय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार..जे म्हणतायत की 4 दिवस होऊनही दारु पिवून कारनं दोघांना चिरडणाऱ्या, वेदांत अग्रवालचा ब्लड रिपोर्ट आलेलाच नाही.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचे पुण्याचे आमदार धंगेकरांनी कलम 304 वरुन फडणवीसांनी दिशाभूल केल्याचा आरोप केला. तर अजित पवार गटाचे पुण्यातल्या वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव आणून कमजोर कलमं लावण्यास दबाव आणल्याचा आरोप आहे. पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी हा आरोप केलाय.

मंगळवारी गृहमंत्री फडणवीस तडकाफडकी पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात आले आणि पत्रकार परिषद घेवून आरोपी वेदांत अग्रवालवर कलम 304 लावलं आणि पहिल्याच FIRमध्ये लावल्याचं सांगितलं. त्यावरुन धंगेकरांनी 19 तारखेचा पहिला FIR ट्विट करुन कलम 304 नाही तर कलम 304 अ लावल्याचं सांगितलं आणि पुणेकरांची फडणवीसांनी दिशाभूल केल्याचा आरोप केला.

पुण्यातल्या अपघात प्रकरणात पोलिसांनी 2 FIR दाखल केलेत. पहिला FIR 19 तारखेला सकाळी 8 वाजून 26 मिनिटांनी दाखल केलेला आहे आणि दुसरा FIR 20 तारखेला दाखल केलेला आहे. पहिल्या FIRमध्ये कलम 304 नसून कलम 304 अ स्पष्ट दिसत आहे. आणि दुसऱ्या FIRमध्ये 304 असून 304 अ सुद्धा आहे. आता धंगेकरांनी ट्विट करुन फडणवीसांवर दिशाभूल करत असल्याचा आरोप केला..त्यावर भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच. ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी. कलम 304 त्यात आधीपासूनच आहे.

मोहोळांनी पत्र ट्विट सोबत पोस्ट केलंय. ते पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळासमोर माहितीपर दिलेलं निवेदन आहे. ज्यात कलम 304 आणि कलम 304 अ आहे.

आता कलम 304 आणि कलम 304 अ काय तेही पाहुयात

कलम 304 म्हणजे, दुखापत करण्याच्या हेतूनं किंवा हेतू शिवाय खून करणे. यात दोषी आढळल्यास 10 वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा आहे.

कलम 304 अ म्हणजे, निष्काळजीपणे किंवा कोणत्याही कृत्याने एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे. दोषी आढळल्यास 2 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरही विरोधक आक्रमक आहेत. कारण 4 दिवस झाले तरी, अमितेश कुमार म्हणतायत की, अजून वेदांत अग्रवालचा ब्लड रिपोर्टच आलेला नाही. त्यामुळं असा कोणता रिपोर्ट आहे, ज्याला 4 दिवस लागूनही येत नाही, असा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्या प्रमाणं अल्कोहोल रिपोर्ट 12 तासांच्या आत सहज मिळतो.

पुण्याच्या अपघात प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरेंवरही आरोप झालेत. रविवारी मध्यरात्री अपघातानंतर, दारुड्या वेदांतचा बाप, बिल्डर विशाल अग्रवालनं आमदार सुनिल टिंगरेंना फोन केला आणि त्यानंतर टिंगरेंनी येरवड्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुखांनी केला. तोच आरोप संजय राऊतांनी पण केला. तर टिंगरेंनी आरोप फेटाळले आहेत.

वेदांतचे वडील बिल्डर विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गृहमंत्री फडणवीसांनी कडक कारवाईचं आश्वासन दिलंय. पण विरोधकांनी पहिल्या 2 FIRवरुन शंका उपस्थित करतानाच आरोप केलेत.