मराठा समाजानंतर धनगर समाजही आरक्षणासाठी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत, मोर्चा काढून दिला इशारा

| Updated on: Oct 31, 2023 | 8:44 AM

Maratha and Dhangar Reservation | मराठा आंदोलनानंतर धनगर समाजही राज्यात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे. आरक्षणासाठी सांगलीमधील तासगावमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. पारंपारिक वाद्य, शेळ्या मेंढ्यासह हजारो धनगर समाज बांधव या मोर्च्यात सहभागी झाले होते.

मराठा समाजानंतर धनगर समाजही आरक्षणासाठी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत, मोर्चा काढून दिला इशारा
धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला.
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

शंकर देवकुळे, सांगली | 31 ऑक्टोंबर 2023 : राज्यात मराठा आंदोलनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शांततेने सुरु असलेले हे आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून हिंसक बनले आहे. त्याचवेळी धनगर समाजही आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. सांगलीमधील तासगावमध्ये त्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या मुदतीत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर समाजाचा उद्रेक होईल, त्याला सर्वस्वी शासन जवाबदार राहील, असा इशारा समस्त धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. धनगर समाजाकडून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याची तयारी सुरु केली आहे. यामुळे राज्यात दुसरे आरक्षण आंदोलन व्यापक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाद्य, शेळ्या मेंढ्यासह हजारो धनगर समाज बांधवांचा मोर्चा

धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये धनगर समाजाकडून भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. तासगाव येथील भिलवडी नाका या ठिकाणी मोर्च्यास सुरुवात झाली. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चामध्ये पारंपारिक वाद्य आणि शेळ्या मेंढ्यासह हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्च्यातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला.

गावबंदी करण्याचा इशारा

मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाला खासदार-आमदार आणि लोकप्रतिनिधींनी पाठिंबा द्यावा, अशी मागणी मोर्च्यात करण्यात आली. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा आरक्षण मिळेपर्यंत गावागावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. धनगर आरक्षण देण्याचा निर्णय मुदतीत घेतला नाही तर राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करण्याचा इशारा सांगली जिल्हा धनगर महासंघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

मराठा समाज आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी परभणीच्या गंगाखेड येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. राजकारण्यांना गावात प्रवेश बंदी असल्याने आमदार गुट्टे यांनी राहत्या घरी एक दिवसीय अन्नत्याग केले. दोन्ही समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.