Pune News : शेतकरी रोखणार पुण्याकडे जाणारे पाणी, काय आहे कारण

| Updated on: Jul 16, 2023 | 9:15 AM

Pune News : काही वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनावर दक्षिण भारतीय चित्रपट आला होता. त्यात शेतकऱ्यांनी शहराकडे जाणारे पाणी रोखले होते. शेतकऱ्यांचा प्रश्नांवर आधारित हा चित्रपट होता. आता पुणे जिल्ह्यातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेय.

Pune News : शेतकरी रोखणार पुण्याकडे जाणारे पाणी, काय आहे कारण
water pipe line
Follow us on

रणजित जाधव, पुणे, दिनांक 16 जुलै 2023 : शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो. रात्रंदिवस राब राब राबतो. घाम गाळून पीक काढतो. मग शेतात आलेले अन्नधान्य संपूर्ण जगभर पोहचवतो. त्यामुळे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. परंतु या शेतकऱ्यांना नेहमी संकटांना समोरे जावे लागते. कधी शेतमालास भाव मिळत नाही. कधी अतिवृष्ट तर कधी दुष्काळ. परंतु या शेतकऱ्यांचा प्रश्नांवर लक्ष दिले जात नाही. कारण तो एकत्र नाही.

काय आहे प्रश्न

आता शेत जमिनी विविध प्रकल्पांसाठी घेण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे अन् त्या शेत जमिनीचा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांपुढे फेऱ्या माराव्या लागतात. हा प्रश्न पुणे जिल्ह्यात तयार झाला आहे. यामुळे मावळमधील तळेगाव आंबी एमआयडीसीमधील शेतकऱ्यांनी पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास नकार दिला आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सूटत नाही, तोपर्यंत पाईपलाईनचे काम होऊ न देण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

या धरणातून होणार पाणीपुरवठा

मावळच्या तळेगाव एमआयडीसी येथील भामा आसखेड आणि आंध्र धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी तळेगाव एमआयडीसी येथे पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र एमआयडीसीमधील शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवून पिंपरी चिंचवडला पाणी दिले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनही केले.

हे सुद्धा वाचा

पोलीस बंदोबस्त वाढवला

शेतकऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून तळेगाव एमआयडीसी पोलिसांची मदत घेण्यात आली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवत काम सुरू करण्यात आले आहे.

काय आहे शेतकऱ्यांच्या मागण्या

ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईपलाईन जात आहे, त्यांच्या जमीनीचा परतावा न देता ही कामे सुरू आहेत. तसेच जमीन गेलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या गेल्या नाही. जमिनीचा परतावा अन् नोकरी या दोन मागण्यांवर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाइपलाइनचे काम होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच भविष्यात मावळातील पवना जलवाहिनीसारखे मोठे आंदोलन करून काम बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.