अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा राजकीय सामना रंगणार आहे. यावेळी कारण पुन्हा निवडणुकाच आहेत. गेल्या १५ वर्षांपासून विखे पाटलांचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या शिर्डी मतदारसंघातील राहाता बाजार समितीची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार बाळासाहेब थोरात यांनी केलाय. विखेंच्या मतदारसंघात महाविकास आघाडीची मोट बांधत बाळासाहेब थोरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारण तापणार आहे.
काय म्हणाले थोरात
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, २००९ सालच्या विधानसभेला त्यांचा कार्यक्रम करायला पाहिजे होता, अशी कार्यकर्त्यांची खंत आहे. मात्र आम्ही एकाच पक्षात असल्याने एकनिष्ठता दाखवली. आता दोघांचे वेगळे मार्ग आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम करण्यासाठी मी मोकळा झाला आहे. आता कोणतीच अडचण नाही, असे म्हणत थोरातांनी विखे पाटलांना डिवचलय.
कार्यकर्त्यांना बाळासाहेब म्हणाले
शिर्डी मतदारसंघात जिरवाजिरविचा कार्यक्रम मोठा आहे. मात्र तुम्ही घाबरायचे सोडून द्या. शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उडवण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केलंय..
राधाकृष्ण पाटलांची चाल
गेल्या काही महिन्यांपासून राधाकृष्ण विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करत आहे. विविध माध्यमातून त्यांना शह देण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे थोरातांनी देखील राहाता बाजार समितीच्या माध्यमातून विखे पाटलांवर पलटवार केल्याचं बोललं जातंय. विखे पाटील आता थोरातांना कशा पद्धतीने उत्तर देतात हे बघणं महत्वाचं ठरणार असून पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा राजकीय सामना रंगणार असल्याचं चित्र आहे.
विधान परिषद निवडणुकीत थोरात होते नाराज
बाळासाहेब थोरात व्यथित आहेत. काँग्रेस पक्षात त्यांचा वाद आहे. बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यांतील वादही चांगला रंगला होता. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पटोलेविरोधात काँग्रेस पक्षश्रेष्ठीना पत्र लिहिले होते. परंतु त्यानंतर पुणे कसबा पेठ निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला.