अकोले, अहमदनगर : मोठ मोठे डोनेशन अन् भरभक्कम शैक्षणिक शुल्क देऊन अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. त्यांच्यांवर अभ्यासाचा तणाव निर्माण केला जातो. स्कूल, होमवर्क अन् ट्यूशनमधून मुलांमधील नैसर्गिक गुण हरवले जातात. आजही सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण दर्जेदार असल्याचे वारंवर सिद्ध झाले आहे. या शाळेतील मुले उच्च अधिकारीच नाही तर चांगले कलाकार निर्माण झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याची जुगलबंदी दिसत आहे.
काय आहे प्रकार
एक अदिवासी शाळकरी मुलगा आणि शिक्षकाच्या संगीत जुगलबंदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्षवेधी ठरतोय. अकोले तालुक्यातील देवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आर्यन भांगरे आणि शिक्षक संतोष मोरे यांचा हा व्हिडीओ आहे. या दोघांनी नटरंग चित्रपटातील शीर्षक गीत वाजविल्याचं पाहायला मिळतय. शिक्षक मोरे यांनी हार्मोनियमवरुन काढलेल्या स्वरांना आर्यनने बाकालाच वाद्य बनवून पेनाचा वापर करत उत्तम साथ दिलीय. त्यांच्या संगीताची ही जादू पाहून अनेकजण सुखावले आहेत. अल्पावधीत हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. आर्यनमधील कौशल्य पाहून अनेकांना आश्चर्य बसत आहे.
आर्यनमधील कलाकार
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षण नेहमी चर्चेत असते. या शाळांमधून मूल्यशिक्षणापासून कौशल्य विकास करणारे शिक्षण दिले जाते. हसतखेळत तणावरहित शिक्षण मिळते. मुलांवर अभ्यासाचा अतिताण दिला जात नाही. यामुळे मुलांमधील बालपण अभ्यास्याच्या ओझ्याखाली दाबून जात नाही. यामुळे आर्यन भांगरे सारखे कलाकार निर्माण होत आहे. भविष्यातील मोठ्या कलाकरांचे गुण जि.प.शाळेत विकसित केले जात आहे.
जि.प.शाळेत अनोखे प्रयोग
राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांनी केलेल्या उपक्रमाची चर्चा यामुळेच होत असते. सोलापूर जिल्ह्यातील जि.प.शाळेत शिकवणारे रणजितसिंह डिसले सारखे शिक्षक जागतिक स्तरावर पोहचतात. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यातून काळानुसार शिक्षण दिले जात आहेत. यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी भविष्यात चांगले यशस्वी ठरल्याचे उदाहरणे अनेक आहेत.
हे ही वाचा
पुणे शहरातील लोकांना काय आवडते | देशी मद्य, विदेशी मद्य, वाईन की बियर?