अभिजित पोते, पुणे, दि. 11 फेब्रुवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २००४ मधील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष झाला होता. राष्ट्रवादीला ७१ जागा तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष असताना मुख्यमंत्रीपद का घेतले नाही? याचा खोलात मी जात नाही. परंतु त्यावेळेस राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. आताही जर दमाने घ्या. थोडी कळ सोसा, सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असा म्हणणाऱ्या पक्षातील नेते अन् कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी चपराक दिली.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांचे नाव घेतले नाही. परंतु त्यांनी जोरदार हल्ला केला. ते म्णाले, आधी पाच, पाच दहा वर्ष फोन केले जात नव्हते. चौकशी केली जात नव्हती. आता फोन केले जात आहे. विचारपूस होत आहे. काय कसे चालले आहे? विचारत आहेत. परंतु कोणाचे फोन आले तरी हळवे होऊ नका. तुमच्या मनाची चलबिचल होऊ देऊ नका, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मला फोन करण्यास वेळ नाही. कारण मी फोन केल्यास मला इतर कामे करता येणार नाही. परंतु मी तुम्हाला विकासाचे काम करुन देईल. तुमचे कुठलेही काम किंवा प्रश्न आणला तरी ते पूर्ण होईल. त्याबद्दल तुम्ही काळजी करु नका. आता आपणास आज एका नव्या विचाराने पुढे जायचे आहे. आपल्या पक्षाची फरफटत होऊ नये, यासाठी ही नवी भूमिका आपण स्वीकारली आहे. आता तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे.
सेक्युलर विचारसरणी आपण सोडलेली नाही. आता आपण भाजप सोबत का गेलो,हे मी अनेकदा सांगून झालं आहे. मला तेच तेच उकरून काढायचं नाही. आता आपल्याला विकासावर भर द्यायचं आहे. एकाच धोरणावर अवलंबून राहायचं नसतं, काळानुरूप बदलायचं असतं.