पुणे: नवाब मलिक यांच्या प्रश्नावर अजित पवार भडकलेले पाहायला मिळाले. मला नो कमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत जसा मला प्रेस घेण्याचा अधिकार आहे, तसाच नो कमेंट्स म्हणण्याचाही अधिकार आहे, असं म्हणत अजित पवार पत्रकारांवर भडकले. नवाब मलिक आणि वानखेडे यांच्याबद्दल त्यांचे त्यांचे प्रश्न त्यांनाच विचारा. मला यावर काहीही बोलायचं नाही, असं अजित पवार म्हणाले.
ऐका जरा मी मागेपणं सांगितलेलं आहे. त्यांनी असं म्हणलं तसं त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही.मला एक अधिकार आहे ना नो कॉमेंटस म्हणायचा अधिकार आहे की नाही. आहे की नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे तसा मला नो कॉमेंटस म्हणायचा अधिकार आहे की नाही. मी आपल्याला जे काही सांगायचं ते सांगितलं आहे. तुमचा ही वेळ घालवू नका, माझाही वेळ घालवू नका. मी सांगतो ते ऐकून घ्या, तुम्हाला तुमचंच खरं करायचं असेल तर मी उठून जातो, तुम्हाला काय चालवायचं आहे ते चालवा, अशा शब्दात अजित पवार यांनी नवाब मलिक आणि एनसीबी, आर्यन खान प्रकरणी संताप व्यक्त केला.
कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली असेल तरीही त्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
राज्यात सिनेमा थिएटर्स, नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटर सुरू झाल्यानंतर होणाऱ्या परिणामांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. जर रुग्णसंख्या वाढली नाही तर शंभर टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील उड्डाण पुलाचं काम लवकरच सुरू करण्यात येणरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी स्वत: या पुलाच्या भूमिपूजनाला येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच मेट्रोच्या कामासाठी नागपूर पॅटर्नही वापरण्यात येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इतर बातम्या:
गोड बातमी! पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा