विधानसभा निवडणुकीत मतदानाला आता दहा दिवसांचा कालावधी राहिला आहे. यामुळे प्रचाराला जोर वाढला आहे. राज्यात अनेक बड्या नेत्यांचा सभा होत आहे. त्यावेळी सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघातील निवडणुकीकडे लागले आहे. बारामतीमध्ये काका अजित पवार पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. लोकसभेला भावजय-नणंद सुनैत्रा पवार-सुप्रिया सुळे लढत रंगली होती. त्यामुळे विधानसभेत काय होणार? याकडे लक्ष लागले आहे. बारामतीमधील लढतीबाबत अजित पवार यांनी मत व्यक्त केले आहे. बारामतीत आपणास लाखांच्या पुढे लीड असणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
बारामतीकरांची द्विधा मनस्थिती आहे. माझी त्यांना विनंती आहे लोकसभेला सुप्रियाताईंना मतदान केले. आता विधानसभेत मला मतदान करतील. बारामतीमध्ये सगळ्यात जास्त काम ही माझ्या कारकिर्दीत झाली आहे. अनेक जणांनी माझ्या बरोबरच कामाला सुरुवात केली आहे. गावातील राजकारणात आपल्या आपल्या वाद आहेत. त्याबद्दल मला चांगले माहिती आहे. पण ते वाद आता पुढे आणू नका. गावच्या वादाचा फटका मला बसू देवू नका.
लोकसभेला तुम्ही पवार साहेबांच्या वयाचा विचार करुन सुप्रिया सुळे यांना निवडून दिले. या वयात सुप्रिया सुळे यांचा झालेला पराभव त्यांना आवडणार नाही. म्हणून तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला. जयंत पाटील यांच्या भाषेत करेक्ट कार्यक्रम केला आणि आम्ही तो स्वीकारला. परंतु आता माझ्याकडे बघून निवडणुकीत सहभागी व्हा. लोकसभेला साहेबांना खुश करण्यासाठी सुप्रियाला मतदान केले. तसे मला खूश करण्यासाठी मतदान करा, असे अजित पवार यांनी म्हटले.
महायुतीला १७५ पेक्षा जास्त जागा मिळणार आहे. महायुतीचे आम्ही सर्व नेते आणि कार्यकर्ते प्रयत्न करत आहे. आम्ही तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष आहे. आमचे नियोजन झाले आहे. त्यासाठी चर्चा झाली आहे. कोणाच्या सभा कुठे घ्यायच्या ही चर्चा अमित शहांसोबत झाली आहे. मी एका बाजूला आहे साहेब एका बाजूला आहेत. मी अनेकांना पद दिली आहेत. बारामती तालुक्याचा वेगळा जाहीरनामा केला आहे.