‘लग्नासाठी मुलीच्या वयाची अट 12 आणि मुलाची 14 ठेवावी लागेल’, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Oct 03, 2024 | 5:58 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा आणि मुलीच्या लग्नाच्या वयाच्या अटीबाबत आज मोठं वक्तव्य केलं आहे. ते बारामतीकरांसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी संबंधित वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी बारामतीत घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरही मत मांडलं.

लग्नासाठी मुलीच्या वयाची अट 12 आणि मुलाची 14 ठेवावी लागेल, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा आणि मुलीच्या लग्नाच्या वयाबाबत भाष्य करताना महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “लग्नासाठी मुलीच्या वयाची अट 12 आणि मुलाची 14 ठेवावी लागेल”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले आहेत. संबंधित वक्तव्य करताना त्यांनी एका घटनेचा किस्सा सांगितला. अजितल पवार यावेळी बारामतीकरांसोबत बोलत होते. “बारामतीकरांनो १९६७ पासून ९१ पर्यंत शरद पवार यांनी प्रतिनिधीत्व केलं. ९१ पासून तुम्ही मला आमदार म्हणून संधी दिली. मी नवखा होतो. मी बरेच शिकण्याचं प्रयत्न केला. मला राजकारणात ३४ वर्ष झाली. बारामतीत कायदा सुव्यवस्था चांगली असावी याचा माझा प्रयत्न सुरू आहे. मला अनेक लोक तक्रारी करत असतात. ड्रग्जबाबतची माहिती दिली जाते. गांज्याच्या गोष्टीही माझ्या कानावर आल्या. मोकातून सुटून आलेले लोक बापाचा चौक असल्यासारखा उभे राहतात. यांनी एरियाही वाटून घेतले. एकमेकांना प्रवेश देत नाहीत. बाहेरही काही लोक शायनिंग करत असतात. त्यातूनच परवा एक सातारा, बारामती आणि सोलापूरमधील तीन मुलं. दोघांच्या मनात आलं. एकाच्या पोटात रामपुरी चाकू खुपसला. दुसऱ्याने कोयत्याने वार केले. सीसीटीव्हीत मी पाहिलं. अशा प्रकारची अवस्था झाली आहे. बिहार यूपीत ही गोष्ट ऐकतो”, असं अजित पवार म्हणाले.

“तुम्हाला कुणाचा प्रचार करायचा असेल तर मुभा आहे. तुम्हाला विचार मांडायचा अधिकार आहे. कुणालाही मते देण्याचा अधिकार नाही. आम्ही फक्त विनंती करू शकतो. मतदान कुणाला करायचे हा तुमचा अधिकार आहे. पूर्वी बाजारात माय मावल्या भाजी विकायला बसायच्या. फळ विकायच्या. तेव्हा कुणी तरी यायचं थोडी कोथंबीर घ्यायचे, मिरच्या घ्यायचे. पूर्वी असे प्रकार चालायचे मला ऐकायला आलं होतं. पण मी पोलिसांना सांगितलं मी इथला आमदार आहे. मला ही दादागिरी चालणार नाही. कोणत्याही मोठ्या बापाचा असेना. माझ्या मांडिला मांडी लावून बसणाऱ्याचा नातेवाईक असला तरी सोडू नका. माझ्या घरातला असला तरी मी खपवून घेणार नाही. कुणालाही वेड्यावाकड्या नजरेने त्रास देता कामा नये”, असं अजित पवार म्हणाले.

‘शक्ती अभियान सुरू करत आहोत’

“परवाची गोष्ट घडली. माझ्या पद्धतीने पोलिसांना जे सांगायचं ते सांगितलं. मी काही निवृत्त अधिकाऱ्यांशी बोललो, विद्यमान पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. माझा जो अनुभव आहे. त्यानुसार आम्ही शक्ती अभियान सुरू करत आहोत. या अभियानांतर्गत महिलांची सुरक्षा केली जाणार आहे. बालकाचं संरक्षण केलं जाणार आहे. तसेच युवकांमध्ये जागृती करायची आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

“एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, शक्ती नंबर ९२० ९३९४९१७ हा नंबर आहे. बारामतीसाठी आहे. तक्रारीसाठीचा नंबर आहे. फक्त बारामतीसाठी आहे. यावर चोवीस तास सेवा राहील. या नंबरवर तक्रार केल्यास कारवाई केली जाईल. नाव गोपनीय ठेवली जाणार आहे. पथकाचा नंबर आम्ही शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि कंपन्याच्या ठिकाणी लावणार आहोत. एखाद्या ठिकाणी अवैध धंदे आढळून आल्यावर तुम्ही व्हिडीओ काढून सांगा”, असं आवाहन अजित पवारांनी केलं. यावेळी अजित पवारांनी एक किस्सा सांगितला.

अजित पवारांनी मुलीचा किस्सा सांगितला

“परवा एका मुलीने अशीच तक्रार केली. यंत्रणा हलली. पोलीस गेले. पण ती मुलगी फिरवत होती. बनवत होती. पोलिसांना डाऊट आला. पोलिसांनी तिला फैलावर घेतलं. त्यावर ती म्हणाली, ते पोरगं चावटपणा करत होतं. त्याला धडा शिकवायचा होता म्हणून मी हा प्रकार केला. कठिण आहे. जेव्हा आपण मुलींना आधार देण्याचं काम करतो तेव्हा त्यांनीही जबाबदारी वागलं पाहिजे. ही गंमत नाही. चुकीचा नंबर डायल केला आणि पोरखेळ केला तर नंबर करणाऱ्यांनाही शिक्षा देऊ”, असं अजित पवारांनी यावेळी बजावलं.

अजित पवार मुला-मुलींच्या लग्नाच्या वयाच्या अटीबद्दल काय म्हणाले?

“आम्ही सरकारशी बोलून राज्य सरकारमध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे. मुलीला १८ आणि मुलाला २१ ही वयाची अट आहे. मुलीला १३ किंवा १२ करावी लागेल. बाराच करावी लागेल आणि मुलाला १४ वयाची अट ठेवावी लागेल. पूर्वीच्या काळात सर्व गोष्टी उशिरा व्हायच्या. म्हणून १८ आणि २१ वय करावे लागले. आता मुलांना लहानपणीच सर्व कळतं. काय चमत्कार झाला माहीत नाही. पण कदाचित जग फास्ट झालं असेल. त्याचा परिणाम झाला असेल. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परिणाम होऊ शकतो. नाही असं नाही. ही गोष्ट घडली”, असं अजित पवार म्हणाले.

“राज्यात बघतो तर अल्पवयीन मुलं मुलीच करत आहेत. पुण्यातही तसंच घडलं. त्यांना रिमांड होममध्ये ठेवावं लागलं. त्यामुळे कायद्यात बदल करावा लागेल. त्यामुळे या नंबरवर कळवायचं आहे. शक्ती कक्षातील नंबरवर कळवायचं आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात शक्ती कक्ष स्थापन केलं जाणार आहे”, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

“मला तुम्ही तलवार भेट दिली तर ती तलवार दाखवणं हा सुद्धा गुन्हा आहे. मला वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं हा गुन्हा आहे. कार्यकर्ते म्हणतात दादा दाखवा. कायदे कडक झाले आहेत. त्यामुळे पिस्तुल, तलवार दाखवले जातात. त्यावर पोलीस कारवाई करतील. परवा गोविंदा म्हणतो, मी सकाळी कोलकात्याला जात होतो. रिव्हॉल्वर बघत असताना गोळी सुटली आणि गुडघ्यात शिरली. अरे गोळी गुडघ्यात कशी शिरली. बरं तू अभिनेता आहे, तू म्हणतोय ते खरं. त्यावर काही बोलताही येत नाही. कारण खासदार होते. खासदारांवर विश्वास ठेवला पाहिजे. पण पुन्हा म्हणाल. दादांनी चिमटा काढला. मी बोलायच्या ओघात बोलत आहे”, असं अजित पवार म्हणाले.