नाविद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती | 24 सप्टेंबर 2023 : भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल दिवसभर मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते. अजित पवार यांनी मुद्दामहून मुंबईत राहणं टाळलं का? अशी चर्चा काल दिवसभर सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांचं एक मोठं विधान आलं आणि पुन्हा चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांनी थेट त्यांच्या अर्थ खात्याशी संबंधित विधान केलं आणि राजकीय वर्तुळाला कामाला लावले. अजितदादांच्या विधानाचा उलटसुलट अर्थ काढला जात असतानाच दुसरीकडे भाजपला त्यावर सावरासावर करताना दमछाक झाली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा यांनी हे विधान केलं. आपल्या संस्था ताकदवान झाल्या पाहिजे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे. आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे. हातात अर्थ खातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण हे पुढे टिकेल की नाही माहीत नाही. पुढचं कुणी पाहिलं नाही, असं अजित पवार म्हणाले. अजितदादा यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
75 टक्के बारामती झोपलेली असते. तेव्हा मी कामाला सुरुवात करतो. माझ्या दौऱ्यामुळे लोकांना त्रास होवू नये हा उद्देश असतो. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे उपमुख्यमंत्री, अर्थ खाते माझ्याकडे आले. सर्व खात्यांना निधी देण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. 288 मतदारसंघात निधी देतोच. पण वाढप्या ओळखीचा असेल तर बारामतीकर दिसल्यावर दोन पळ्या जास्त पडतात. अधिकाधिक चांगलं बारामतीकरांना देण्याचा प्रयत्न करत आहे, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या या विधानावर भाजपने सारवासारव सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भविष्यात काय होईल कुणालाही माहिती नाही.
अजित पवाराचं हे वक्तव्य नैसर्गिक आहे. ते राजकीय विधान नाही. उद्या काय होईल हे तुम्ही तरी सांगू शकता का? तेच अजितदादांनी सांगितलं, अशी सारवासारव चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
अजितदादा शाह यांच्या दौऱ्यात गैरहजर होते, त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवारांच्या बारामतीतील पाच संस्थाच्या बैठका पूर्वनियोजीत होत्या. त्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांनी तसं कळवलं होतं. मीही काल नागपूरातील पूरामुळे जावू शकलो नाही. पण मी कळवलं होतं. गोंधळ निर्माण करण्याची गरज नाही, असं बावनकुळे म्हणाले.