पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं हा त्यांचा अधिकार असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच यात आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघूनच हे सर्व लोकं निवडून आलेत. भाजपचे जे खासदार निवडून आलेत ते मोदी पंतप्रधान होणार म्हणून देशातील जनतेने त्यांना निवडून दिले,” असंही त्यांनी नमूद केलं (Ajit Pawar comment on cabinet expansion of Modi government).
अजित पवार म्हणाले, “जसं राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, तसाच देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अधिकार आहे. मोदींनी कुणाला घ्यावं, कुणाला थांबवावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यात आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करण्याचं कारण नाही.”
“भारती पवार पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्याच आहेत. त्या आदिवासी असून डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना घेतलेलं दिसतंय. कपिल पाटील आग्री समाजाचे आहेत. तेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच आहेत. आम्हीच त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलेलं. त्यांना संधी मिळाली. नारायण राणे कोकणातील नेते आहेत. त्यांनी मध्यंतरी त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. ते पूर्वी काँग्रेसचे नेते होते, शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. त्यांनाही संधी देण्यात आली. त्यानंतर डॉ. भागवत कराड त्यांना संधी दिली. तेही ओबीसीच आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
Ajit Pawar comment on cabinet expansion of Modi government