ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी अनेक राजकीय पदाधिकारी त्यांना भेट देत आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनातील सर्व मुद्दे खोडून काढत उत्तर दिली.
बाबा आढाव यांच्यासमोर बोलताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. बाबा आढव यांनी मांडलेल्या भूमिकेतील काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. काही मुद्दे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. आम्ही निवडणूक आयोगाला लक्षात आणून दिलेली मुद्दे त्यांनी मान्य केले होते. मागील लोकसभा निवडणुकीत आमच्या कमी जागा आल्या. त्यावेळी आम्ही किंवा कोणी ईव्हीएमबाबत बोललो नाही. विधानसभेत आम्हाला यश मिळाल्यावर हा प्रश्न आला आहे.
अजित पवार यांनी पाच महिन्यांतील बदलाबद्दल बारामतीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, बारामतीत लोकसभेत सुप्रिया सुळेंना मतदान झाले. आता विधानसभेत मला मतदान दिले. जनतेने आधीच म्हटले होते लोकसभेत ताईंना तर विधानसभेत दादांना. त्यानुसार राज्यभरात झाले. लोकसभेत महाविकास आघाडीला आणि विधानसभेत महायुतीला मतदान केले. जनतेचाच कौल पाच महिन्यांत बदलला त्याला आम्ही काय करणार? असा प्रश्न अजित पवार यांनी बाबा आढाव यांना विचारला. बाबा आढव यांनी लोकसभेनंतर पाच महिन्यांत इतक कसा बदल होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला होता.
नाना पटोले यांनी म्हटले होते, राज्यात पाचनंतर 78 लाख मतदान कसे वाढले? त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, अहो, नाना पटोलेसाहेब संध्याकाळी मतदान वाढत असल्याचे उदाहरण नेहमीची आहे. तसेच पाचनंतर जे रांगेत मतदार उभे असतात त्यांचे सर्वांचे मतदान होईल.
बाबा आढाव यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. मतदारांना 1500 रुपये दिले हे प्रलोभन असल्याचे म्हटले आहे. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. सरकारी योजना आतापासून नाही. संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यात काँग्रेस पैसे देत होते. आम्ही ते पैसे 1500 रुपये दिले. आता आम्ही 1500 रुपये देत आहोत, परंतु महाविकास आघाडीने 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले. दिल्लीत केजरीवाल यांनी अनेक गोष्टी मोफत दिल्या. बाबा तुम्ही या गोष्टी लक्षात घ्याव्या, असे अजित पवार यांनी त्यांना म्हटले.