‘कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असूदे, कारवाई होणारच’, अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया

| Updated on: May 24, 2024 | 6:30 PM

पुणे अपघात प्रकरणातील दोषी कितीही श्रीमंताच्या बापाचा मुलगा असूदे, त्याच्यावर कारवाई होईलच, अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवारांनी पुणे हिट अँड प्रकरणावर दिली आहे. अपघात प्रकरणात कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असूदे, कारवाई होणारच, अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया
Follow us on

पुणे हिट अँड रन प्रकरणावर अखेर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेनंतर अजित पवार माध्यमांसमोर आले नव्हते. अजित पवारांनी आज अखेर पुण्यात टायटन घड्याळच्या शोरुमच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली. यावेळी अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणाकडे आपलं बारकाईने लक्ष आहे. घटना समजल्यापासून पहिल्या दिवसापासून या घटनेकडे आपलं लक्ष आहे. तसेच या प्रकरणावर आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा देखील केल्याची माहिती अजित पवारांनी दिली. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

“कुणावरही आकस बुद्धीने काही कारवाई होणार नाही. पण जे कुणी दोषी असतील ते किती मोठे असले, कितीही श्रीमंत असले, कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी रितसर जी काही कारवाई असेल ती केली जाईल. कायदा हा श्रीमंताला, गरिबाला आणि मध्यमवर्गीयालादेखील सारखा आहे. नियम सगळ्यांना सारखे आहेत. त्याचप्रमाणे कारवाई चाललेली आहे”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली.

‘कारण नसताना एक गैरसमज पसरवला जातोय की…’

“मी 20 आणि 22 तारीख या दोन्ही दिवशी सकाळी 9 वाजेपासून मंत्रालयात होतो. मी या घटनेच्या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून होतो. माझं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं. देवेंद्रजी मला म्हणाले की, मी तातडीने पुण्याला निघालो आहे. मी स्वत: त्याकडे जातीने लक्ष घालणार आहे. त्यांनी लक्ष घालून पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजात केला जातोय की, या प्रकरणाकडे पालकमंत्र्याचं लक्ष नाही”, असा खुलासा अजित पवारांनी केला.

‘कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होता कामा नये’

“मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मीडियाच्या अनेक लोकांना माहिती आहे. मी माझं काम करत असतो. आजही चेक करा की, अजित पवार 21 तारखेला सकाळी मंत्रालयात होता की नाही. माझं कामं काय चालली होती की, एकतर या प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होता कामा नये. ही घटना अतिशय गंभीर आहे. अशाप्रकारच्या घटना कदापि होता कामा नये. कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे”, असं अजित पवार म्हणाले.

‘ज्या गोष्टी कडक घेतल्या जायला हव्यात तशा…’

“या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याबद्दल मला वेळोवेळी पोलीस आयुक्तांनी जी माहिती द्यायची होती ती देत होते. पोलीस आयुक्तांनी स्वत: तुमच्यासमोर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. मी आजही पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यांनी प्रत्येक मिनिटोमिनट काय-काय घडलं याविषयी सांगितलं. अल्पवयीन आरोपीला बेल कशी मिळाली? हे देखील तुम्हाला समजलं आहे. त्याबाबत वेगवेगळ्या बातम्या आल्या. न्यायालयाने बेल का द्यावी हा न्यायालयाचा प्रश्न आहे. या प्रकरणी ज्या गोष्टी कडक घेतल्या जायला हव्यात तशा कडक घेतल्या गेल्या आहेत”, असं अजित पवारांनी सांहितलं.

‘माझं बारकाईने लक्ष’

“या प्रकरणात कोणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वत: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पालकमंत्री म्हणून लक्ष घातलं आहे. मी पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून लक्ष देवून आहे. माझं बारकाईने लक्ष आहे. त्याची तीव्रता कमी झाल्यावर मग फाटे फुटतात. पब संस्कृती वाढली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु झाली आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.