पुणे | 29 सप्टेंबर 2023 : पुणे शहराला स्वत:चे विमानतळ नाही. लष्कराच्या लोहगाव विमानतळावरुन पुणे शहरातील विमाने जात असतात. यामुळे पुणे शहराजवळ पुरंदर येथे विमानतळ सुरु करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु होती. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. आता जमीन संपादन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचवेळी पुणे जिल्ह्यातील आणखी एक विमानतळ सुरु करण्यासाठी पावले उचलली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात बैठक घेतली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमानतळ सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी बारामतीसह 5 विमानतळांचा ताबा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुरंदर विमानतळ सुरु करण्यासाठीही अजित पवार यांनीच पुढाकर घेतला आहे.
मुंबईत मंत्रालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या विमानतळांबाबत बैठक पार पडली. त्यात राज्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती ही विमानतळे सुरु करण्यासाठी एमआयडीसीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानसेवा सुरू होण्याच्या द़ृष्टीने ही पाचही विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्यात आली होती.
नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती ही विमानतळ सुरु करण्याचा प्रस्ताव गेल्या चौदा वर्षांपासून होता. परंतु खासगी कंपनीकडून यासंदर्भात काहीच पावले उचलली गेली नाही. यामुळे अखेर एमआयडीसीकडे ही विमानतळे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यास आणखी पाच विमानतळे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील पुरंदर विमानतळ झाले तर जिल्ह्यात तीन विमानतळ होणार आहे. लोहगाव, पुरंदर आणि बारामती अशी तीन विमानतळ होणार असल्यामुळे देशातील विविध भागांत विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरु होण्याची शक्यता आहे.