पुणे | 21 सप्टेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध विषयावर कामे सुरु केली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आता पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी पावले उचलली आहे. लोणावळ्यात ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा, असे आदेश अजित पवार यांनी दिले आहे.
लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट पर्यटकांसाठी आवडीची ठिकाणे आहेत. या ठिकाणी असलेल्या निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी अजित पवार यांनी ग्लास स्कायवॉक उभारणीची योजना तयार केली आहे. यासंदर्भात सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा, असे आदेश त्यांनी पर्यटन विभागाला दिले आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी हे आदेश दिले. यावेळी पर्यटन विभागाचे अधिकारी आणि पुणे जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
लोणावळा परिसरात निसर्ग संपदा चांगली आहे. यामुळे या ठिकाणी लहान मुले येतात. त्यांच्यासाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांची उभारणी करण्यासाठी पावले उचलली जात आहे. यासंदर्भातील आराखडा महिन्याभरात तयार करावा. सर्व प्रकारच्या सुविधांची निर्मिती करताना पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा केली होती. लोणावळ्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी काचेचा स्कायवॉक उभारण्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. लोणावळ्यातील 4.84 हेक्टर परिसरात हा प्रकल्प तयार होणार आहे. झीप लाईनींगसारखे साहसी खेळ असतील. तसेच फुड पार्क, ॲम्पी थीएटर, खुले जीम असणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे पर्यटन नगरी पूर्णपणे बदलणार आहे. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आणखी वाढणार आहे.