उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं. “हे तुमच्या आमच्या घरातील लग्न नाही, माझा फोटोच नाही, माझं नावच घेतलं नाही, असं चालणार नाही. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आहे. तुम्ही निधीची चिंता करू नका. सगळे निधी मिळतील. अनेक निधी आमच्या भागात दिले आहेत. आम्ही करून दाखवलं आहे”, असा दावा अजित पवार यांनी केला. “गुंडगिरी, दादागिरी दहशत मी खपवून घेणार नाही. कुठलीही व्यक्ती असो, ती खपवून घेतली जाणार नाही”, असं अजित पवार म्हणाले. “विरोधकांना प्रचाराचा मुद्दा नाही म्हणून ते सांगत आहेत. पुढे निवडणुका होणार नाहीत. संविधान बदलणार आहेत. पण यावर स्वतः मोदी स्पष्ट बोलले आहेत. विरोधक दिशाभूल करत आहेत. यावर अजिबात विश्वास ठेवू नका”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
“गावकी किंवा भावकीची ही निवडणूक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे. हे मी नेहमी सांगतो आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपले अनेक प्रश्न आहेत. मुळशीला 494 कोटींचा प्रकल्प आहे. पुढील 40- 50 वर्ष समोर ठेवून पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. पण त्यांनीही त्यांची कारकीर्द आठवावी. अनेक महिने झाले सरकारमध्ये गेलो आहोत. अनेक आम्ही उपक्रम राबवत आहोत. विरोधकांनी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आमची युती कशी तुटेल? याबाबत चर्चा निर्माण केली. बारामतीत सात वेळा निवडून आलो. त्या बारामतीत कसा विकास केला ते पाहायला या. गाफील राहू नका, समोरील विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील”, असा टोला अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला.
“15 वर्ष झाली. या भागात एक खासदार आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या कामाचा आढावा घ्या. मी मागील काळात सोबत काम करत होतो. ते खासदार बघतात. आपण नको लुडबुड करायला, असं मला वाटायचं. तरी मी अनेक बैठका घ्यायचो. लोकसभा निवडणुकीत काही चूक केल्यास देशातील नागरिकांना याची किंमत चुकवावी लागेल. नुसतं खासदार होऊन उपयोग नाही तर सत्तेतील खासदार व्हावं लागतं. तर काम होत नाही. नुसतं संसदेत भाषण ठोकून काय होत नाही, त्यासाठी केंद्र आणि राज्यातून निधी आणावा लागतो. मगच विकास होतो”, असा दावा अजित पवार यांनी केला.
“नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर गरिबांना शून्य लाईट बिल येणार आहे. मोदींना पाठिंबा देणाऱ्या खासदाराला निवडून द्या. आपल्याकडे निदान पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी आहेत, जर दुसरीकडे बघितलं तर राहुल गांधी यांच्यापेक्षा मोदीचा चेहरा उजवा आहे. मोदींच्या विचारांचा खासदार निवडून द्या तर विकास करता येईल. जास्तीत जास्त खासदारांची संख्या मोदींसाठी पाठवायचे आहेत”, असं अजित पवार म्हणाले.