पुणे : राज्याच्या राजकारणात शुक्रवारचा दिवस हा अजित पवारांनी (Ajit Pawar) गाजवलाय म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण दिवसभर हेडलाईनमध्ये असलेले अजित पवार मावळमधील राष्ट्रवादीच्या सभेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले. सर्वाधी एका पोलीस अधिकाऱ्याला बारीक व्हा…बारीक व्हा…म्हणताना अजित पवार दिसून आले. त्यानंतर दुपारी पुण्यात त्यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर (Hanuman Birth Place) हमरातुमरीवर आलेल्या साधू, महंतांचा समाचार घेतला. तर त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांनो तुम्ही किती टाळ्या वाजवा…मी चुकीचं काय बोलणार नाही…आधी बोललो तेव्हा आमत्मचिंतन करावं लागलं, असे म्हणत कार्यकर्त्यांची फिरकी घेतली. तर रात्री राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवार हातात धनुष्यबाण (Bow Arrow) पकडताना दिसून आले. त्यांनी फक्त धनुष्यबाण हातात नाही घेतला. तर बाणाच्या दोरीला ताण देत निशाणा लावत कॅमेऱ्याला पोजही दिली. त्यामुळे पुन्हा अजित पवारांच्या या हटके अंदाजाची चर्चा होऊ लागली.
आज मावळमध्ये राष्ट्रवादीचे सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादीची सभा घेतली. या सभेला अजित पवार यांनी आणि आमदार रोहित पवार यांनीही उपस्थिती लावली. अजित पवार कार्यक्रमात पोहोचले. त्यावेळी इतर नेत्यांची भाषणं सुरू होती. मात्र त्याचवेळी काही कार्यकर्ते अजित पवारांच्या सत्काराला स्टेजवर पोहोचले. अजित पवारांनीही त्यांना हातात देत आपुलकीने स्टेजवर बोलवून घेतलं. त्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा सत्कार तर केलाच मात्र धनुष्यबाण थेट अजित पवारांच्या हातात दिला. मग गप्प बसतील ते अजित पवार कसले. अजित पवारांनी बाण दोरीवर धरला आणि निशाणा लावत, मिश्कील हास्य करत कॅमेऱ्याला मस्तपैकी पोज दिली.
येत्या काही दिवसांतच राज्यात अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी बेरजेचं राजकारण करा, असं पवार साहेबांनी सांगितलं आहे. त्यानुसार बेरीज वाढत आहे, लोकांच्या अपेक्षा वाढतायेत, असा सूर राष्ट्रवातीच्या गोटात यावेळी दिसून आला. मात्र अजित पवारांची ही पोज आणि फोटो मात्र चर्चेत राहिला.