पुणे | 24 ऑगस्ट 2023 : नाशिकहून थेट पुणे शहरात (Nashik- Pune) जाण्यासाठी रेल्वे नाही. यामुळे या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेनची (Pune Nashik high Speed Train) घोषणा झाली. या रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाकडूनही मंजुरी दिली आहे. महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (महारेल) कडून या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु या प्रकल्पाची सर्व कामे कासवगतीने होत आहे. यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पुणे-नाशिक लोहमार्गाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पुणे, नाशिक रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर करा, असे आदेश अजित पवार यांनी दिले.
गेल्या पंचवीस वर्षांपासून पुणे, नाशिक रेल्वे मार्गाचा प्रकल्प रखडलेला आहे. यासंदर्भात अनेकवेळा घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्षात कामे सुरु झाली नाहीत. तसेच सुरु झालेली कामे संथगतीने होत आहे. यामुळे पुणे-नाशिक रेल्वे मार्ग मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासारखा होणार की काय? हा प्रश्न विचारला जात आहे.
पुणे, नाशिक मार्गासाठी फेब्रुवारीच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली होती. या प्रकल्पाचे सादरीकरण त्यांनी केले होते. यानंतर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखवली होती.
नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग 235 किलोमीटर लांबीचा आहे. हा मार्ग पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचा वेग तासी 200 किलोमीटर असणार आहे. यामुळे पुणे-नाशिक अंतर दोन तासांत होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, नाशिक मार्गावरील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन वेळेची आणि इंधनाची बचत आहे. पुणे-नाशिक मार्गावर 24 स्थानके असणार आहेत. त्यात 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग असतील.