प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 14 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिवाळीच्या निमित्ताने अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या गोविंद बागेत भेटीगाठी घेत आहेत. पवार कुटुंबिय दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने गोविंद बागेत एकत्र येतात. यावर्षीदेखील पवार कुटुंबिय गोविंद बागेत एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गोविंद बागेत आले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार हे देखील गोविंद बागेत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे गोविंद बागेत आज दुपारी झालेल्या पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे राज्यभरात याबाबत चर्चा सुरु होती. कारण अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासोबत असायचे. पण आज ते उपस्थित नव्हते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण आता गोविंद बागेत अजित पवार दाखल झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवार शरद पवार यांच्यासह स्नेहभोजन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा एकत्र साजरा होणार आहे.
अजित पवार आज सकाळीच काटेवाडीत आल्याची माहिती समोर आली होती. पण काटेवाडीत असूनही अजित पवार आज दुपारी गोविंद बागेत आले नाहीत, अशी चर्चा सुरु होती. काटेवाडीत भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच्या एक दिवस आधीच ते आज काटेवाडीत दाखल झाले. ते आज दुपारी गोविंद बागेत दाखल झाले नाहीत. पण रात्री शरद पवार यांच्यासोबत स्नेहभोजनासाठी ते गोविंद बागेत दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज सकाळपासून शरद पवार यांची गोविंद बागेत येवून भेट घेत आहेत. ते शरद पवारांचा आशीर्वाद घेत आहेत. पण सकाळपासून अजित पवार गोविंद बागेत न आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण अजित पवार रात्री स्नेहभोजनासाठी गोविंद बागेत आले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांची गोविंद बागेतील ही भेट महत्त्वाची आहे. या भेटीत काय-काय चर्चा होतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.