रणजित जाधव, Tv9 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड | 9 फेब्रुवारी 2024 : मुंबईच्या दहीसर येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवर अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर आरोपीने स्वत:ला गोळ्या झाडत संपवलं. या घटनेवरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे. विरोधकांनी या घटनेवरुन राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नको. पोलीस आपलं काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “काल एक घटना घडली. दोघे फेसबुकवर लाईव्ह करत होते. पण एकाने अचानकपणे दुसऱ्याला बंदुकीने गोळ्या घातल्या. आता दोघे बंदिस्त ठिकाणी गप्पा मारत असतील तर ते मित्र आहेत असंच वाटणार. पोलिसांना ही तेच वाटलं. पण नंतर एकाने दुसऱ्या मित्राला गोळ्या घातल्या. आता फेसबुक लाईव्हवर हे घडलं. हे बघा पोलीस पोलिसांचं काम करतायेत, यात कोणतंही राजकीय हस्तक्षेप नको”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. ते पिंपरी चिंचवड येथे कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांनी खासदार संजय राऊतांवरही टीका केली. “रोज सकाळी उठून कोणीतरी बरळत असतात, मला त्या फांद्यांत पडायचं नाही. त्यांना काही उत्तर देत बसण्यापेक्षा मला कामं करायची आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा साधला. “लवकर निवडणुका व्हाव्यात, अशी माझी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. निवडणुकी संदर्भातील ओबीसींचा निकाल कसा लवकर लागेल याचा आमचा प्रयत्न सुरू आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“सरकारमध्ये सहभागी व्हायचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून घेतला. बहुजनांच्या विकासासाठी हा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टीने विकास करत आहेत. पुण्यातील विमानतळाची पाहणी केली. 1 कोटी पेक्षा अधिक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मोठं-मोठी उड्डान घेता येणार आहेत. धावपट्टी अधिक लांब होणार आहे. 70 मजली इमारतीपर्यंत पोहचता येणार, 14 कोटी रुपयांची वाहन आहेत. आयुक्तांना सांगतोय तुम्हाला सर्व अधिकार आहेत. काही कामे लांबली आहेत ती लवकर व्हायला हवीत”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
“या साफसफाई यंत्रामुळे कुठल्याही कामगारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे. संपूर्ण शहरात हे यंत्र फिरणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे. तुमच्यापैकी अनेक जण दुबई, लंडन, सिंगापूर सारख्या देशात फिरण्यासाठी जातात. तिथं गेलं की कचरा खिशात ठेवता आणि इथे भारतात आले की टाक कुठंपण कचरा. असं का? हा देश आपला आहे म्हणून असं करता का? हे योग्य नाही”, असं मत अजित पवारांनी मांडलं.
“आळंदी, देहू, राजगुरूनगर, वाघोली या भागात लोकसंख्या वाढलेली आहे. हा पट्टा एकत्र करावा लागणार आहे. तिथं नवी महापालिका स्थापन करावी लागेल. मी त्या दृष्टीने पावलं टाकतोय”, असं सूचक वक्तव्यदेखील अजित पवारांनी यावेळी केलं. “पुणे पिंपरी चिंचवडला रिंग रोड झाल्याशिवाय पर्याय नाही. नुकतंच त्या कामासाठी 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मेट्रोचं जाळं सर्वत्र पसरावे लागणार आहे. तरच वाहतूक कोंडी सुटणार आहे”, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.