वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार

| Updated on: Jun 12, 2021 | 12:20 PM

आषाढी वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच वारीसाठी काही अटी आणि शर्तीही घालण्यात आल्या आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार
Ajit Pawar
Follow us on

बारामती: आषाढी वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच वारीसाठी काही अटी आणि शर्तीही घालण्यात आल्या आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वारीची परंपरा टिकली पाहिजेत. पण कुंभमेळ्यात जे घडलं, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. (ajit pawar reaction on ashadi wari restrictions)

अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी, पोलीस, प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि इतरांशी चर्चा करूनच राज्य सरकारने वारीबाबतचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली वारीची परंपरा टिकली पाहिजे. परंतु, सध्या कोरोनाचं सावटही आहे, त्यांचा विचारही केला पाहिजे. त्यामुळे वारीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीसाठी शिथिलता देण्यात आली आहे, असं पवार म्हणाले.

तर वारकऱ्यांशी चर्चा करू

मागील वर्षी वारीला जे निर्बंध घालण्यात आले होते. तसेच निर्बंध आता लावण्यात आलेले नाहीत. कुंभमेळ्यात जे घडलं तसं इथं घडू नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे. वारीची परंपरा टिकली पाहिजे. त्यासाठी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे, असं ते म्हणाले. आम्ही वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर करतो. राज्याच्या आरोग्याच्या हिताकडेही लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. मात्र, वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र असतील तर त्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचना देऊन संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्यास सांगू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

10 पालख्यांना 20 बसेस देणार

या दहाही मानांच्या पालख्यांना वारीला जाण्यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती कालच पवारांनी दिली होती.

या आहेत मानाच्या 10 पालख्या

1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)

2) संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

3) संत सोपान काका महाराज (सासवड)

4) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

5) संत तुकाराम महाराज (देहू)

6) संत नामदेव महाराज (पंढरपूर)

7) संत एकनाथ महाराज (पैठण)

8) रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)

9) संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनग )

10) संत चांगाटेश्वर महाराज (सासवड) (ajit pawar reaction on ashadi wari restrictions)

 

संबंधित बातम्या:

मानाच्या 10 पालख्यांना आषाढी वारीसाठी परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय?; ‘ते’ 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते!

या वातावरणात वाढदिवस साजरा करणं पटत नाही, माझ्या भेटीसाठी येऊ नका, तुमच्या घरीच राहा: राज ठाकरे

(ajit pawar reaction on ashadi wari restrictions)