प्रदीम कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 21 ऑक्टोबर 2023 : कंत्राटी भरती अखेर रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पण कंत्राटी भरतीचं पाप आमचं नव्हतं ते पाप तर काँग्रेस सरकारचं होतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या निर्णयानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्द्यावर आज भाष्य केलं. तसेच विरोधकांनी केवळ अपप्रचार केल्याचा दावाही त्यांनी केला.
अजित पवार आज पुण्यात आहेत. पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी घाटावर वृक्षारोपणही केलं. त्यानंतर ते मीडियाशी संवाद साधत होते. कंत्राटी भरतीवर विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला. तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जातील असं सांगितलं गेलं. मात्र वस्तुस्थिती वेगळी होती. कॅबिनेटमध्ये हा विषय आला होता. तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती मांडतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानुसार त्यांनी वस्तुस्थिती मांडली आहे, असं अजित पवार म्हणाले.
आपण दीड लाख नोकर भरती करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. आता कोणी माफी मागायची आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे, असा टोलाही अजितदादांनी विरोधकांना लगावला आहे.
तुम्ही झोपेत असता बाकीचे सगळे झोपेत असतात. इतरांना त्रास होवू नये, कामाची पाहणी करता यावी म्हणून मी सकाळी येतो, असंही त्यांनी सांगितलं. नदी सुधार प्रकल्पाच्या कामात दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. पर्यावरणवाद्यांचा पण यामध्ये विचार करण्यात आला आहे. काहीजण कोर्टात गेले होते. मात्र महापालिकेनं बाजू मांडली. अशी कामं आधी इतर ठिकाणी झाली आहेत. अहमदाबादलाही काम झालं आहे. अहमदाबादमधील कामात काही त्रुटी होती का याची पाहणी करून एक टीम आली आहे. झाडं टिकली पाहिजे. कामही चांगली झाली पाहिजे, असं दादा म्हणाले.
अजित पवार यांनी यावेळी प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध घेतला. याचा सुगंध खूप भारी येतो, असं अजितदादा म्हणाले. यावेळी त्यांनी या फुलांची किंमतही अधिकाऱ्यांना विचारली. तेव्हा, या फुलांची किंमत 3 हजार रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी अजितदादांना सांगितलं. तेव्हा, एवढी महागडी झाडं लावणार का? असा सवाल दादा यांनी करताच एकच खसखस पिकली. यावेळी अजितदादांनी नदी सुधार प्रकल्पाच्या घाटावर वृक्षारोपणही केलं.