सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीतून भाकरी फिरवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे अजित पवार नाराज झाले आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनीही माध्यमांकडे रविवारी भूमिका मांडली.
काय म्हणाले अजित पवार
मी सुप्रिया सुळे यांच्या निवडीवर नाराज नाही. राज्यात माझ्यावर विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली आहे. मला राष्ट्रीय राजकारणाची आवड नाही. माझी कामाची पद्धत आणि राष्ट्रीय पातळीवरील कामाची पद्धत यामध्ये फरक मोठा आहे. त्यामुळे ३० ते ३५ वर्षांपूर्वीच मी ठरवले की मी राज्याच्या राजकारणात राहणार आहे. मी नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही.
माझ्यावर राज्यातील अनेक कामे
माझे राज्यातील अनेक कामे सुरु आहेत. दौरे सुरु आहेत. आगामी काळात मी जळगाव, धुळे, अमळनेर दौऱ्यावर आहे. नागपूरला मी जाणार आहे. माझे विविध कार्यक्रम ठिकठिकाणी आहे. त्या ठिकाणी मी आमची भूमिका मांडत असतो. सत्ताधारींचे कामांवर बोलतो. जनतेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारतो. जनतेचे प्रश्न अन् शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या बैठकीला का नव्हते?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाल्यानंतर शनिवारी बैठक झाली होती. या बैठकीला अजित पवार नव्हते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कालची बैठक राष्ट्रीय पातळीवरची पदाधिकाऱ्यांची होती. मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्यातील पदाधिकारी आहे. त्यामुळे मी बैठकीला नव्हतो. तसेच माझे पुण्याचे विमान दुपारी ४ वाजता होते. त्याचा एका तासापूर्वी विमानतळावर पोहचावे लागते. त्यामुळे मी निघून आला होतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी काल केले होते ट्विट
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेरबदलानंतर शनिवारीच ट्विट केले होते. त्यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!, आज रविवारी पुन्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.