प्रदीप कापसे, पुणे | 9 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आक्रमक शैलीमुळे परिचित आहे. कोणतीही भीडभाड न ठेवता ते रोखठोक बोलतात. शनिवारी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एकत्र आले. यावेळी शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात त्यांनी शिक्षकांना आरसा दाखवला. त्यांचे कान टोचले. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सुनावले. यामुळे त्यांच्या भाषणाची चर्चा चांगली रंगली होती.
राज्य शासन शिक्षणावर 80 हजार कोटी खर्च करतो. शिक्षणासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळातील सहकारी कुठेही काटकसर करत नाही. कारण ज्ञान संपादन करण्याचे महत्व सर्वांना माहीत आहे. शिक्षकांच यश हे त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते. राजकारणात काम करत असताना माझा देखील शिक्षणसंस्थाचे काम करण्याचा अनुभव आहे. जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी या भागात शिक्षकांच्या संख्या कमी आहे. त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांवर होत असतो. यामुळे सुरज मांढरे यांना शिक्षण आयुक्त काम दिले आहे.
पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल लागला आहे. या परीक्षेत 640 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात शिरूरची मुले सर्वाधिक आहेत. दुसऱ्या क्रमांकावर खेड तर सातव्या क्रमांकावर बारामती तालुका आहे. पुरंदर तालुक्यातून एक जण उत्तीर्ण झाल्यामुळे अब्रु राखली गेली आहे. शिक्षकांना विनंती करतो की तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा. मी त्या अडचणी सोडवतो. परंतु विद्यार्थी घडवायचे काम करा. नाहीतर तुमच्यावर एक माणूस प्रमोशन करून आणून बसवावा लागेल, अशी वेळ आणू नका. शिरूर तालुक्यात चांगला निकाल लागतो, परंतु हवेली अन् दौंडमध्ये शून्य टक्के निकाल आहे. निकाल शून्य असताना हवेलीत अनेक शिक्षकांना बदल्या हव्या असतात.
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उशिराने दाखल झाले. त्यावरुन अजित पवार यांनी त्यांना उपदेशाचे डोस पाचले. कार्यक्रमाला लवकर जायला शिका. लवकर वेळेवर उठायला शिका. चंद्रकांत पाटील स्टेजवर असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. यामुळे त्याची चांगली चर्चा रंगली.