बारामती | 26 ऑगस्ट 2023 : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. त्यामुळे अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगलाच उत्साह संचारलेला होता. अजित पवार यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते आणि बारामतीकर एकवटले होते. अजित पवार यांचं बारामतीत जंगी स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात अजित पवार यांची भव्य मिरवणूक बारामतीत काढण्यात आली. बारामतीकरांकडून अजित पवार यांना नागरी सत्कार देवून सन्मानित करण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी भाषण केलं.
“खरंतर आज मला प्रश्न पडलाय की, मी बारामतीकरांसमोर काय बोलायचं? असा प्रश्न कधी याआधी पडला नव्हता. तुम्ही सर्वांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली. मी आज जो काही आहे जसा काही आहे तो बारामतीकरांमुळे आहे, बारामतीकरांमुळे मी नेहमी सांगत, असतो बारामतीकरांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाहीत. मी आपल्याशी नेहमी सारखा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे”, असं बोलून अजित पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
“मला आज पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत, सरकारमध्ये सहभागी झाला. आम्ही अनेक जबाबदार, राष्ट्रवादी पक्षाचे अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते, नेते, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भायदास पाटील, आम्ही सगळे अनेक वर्ष संघटनेसाठी काम करतोय. गेली अनेक वर्ष तुम्ही पाहताय. सगळ्यांनी वेगवेगळ्या खात्याची जबाबादीर स्वीकारलेली आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“मी पहिल्यापासून सर्वधर्म समभाव मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, महापुरुषांचा आदर्श, शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम मी करत आलो आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन माझ्यावर पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हापासून अधिवेशन होतं, वेगवेगळी कामं होती, तुम्हाला माहिती आहे, मी कामाचा भोक्ता आहे, कामात रममाण होणारा कार्यकर्ता आहे. त्यासाठी कोणतं पद माझ्याकडे आहे का नाही, याचा विचार मी करत नाही’, असं अजित पवार म्हणाले.
“अधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये असेल प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन करायचं, त्यामध्ये जातीपातीचा, नात्याचा विचार करायचा नाही, ही गोष्ट जवळपास 30 ते 32 वर्षांपासून तुम्ही पाहत आला आहात. आता बारामती बदलत आहे. त्यामुळे शेवटच्या व्यक्तीलाही वाटलं पाहिजे की, हा माणूस आपलाही विचार करतोय. तेच लक्ष डोळ्यासमोर मी ठेवून काम करत आलो आहे”, असं पवार म्हणाले.
“कधीकधी काही कठोर निर्णय घेत असताना रोड वायडिंग करावं लागतं, कुणाची घरं काढावी लागतात, कुणाच्या तरी श्रद्धास्थान काढावं लागतं, कधीकधी कुणी टीका करतं, पण बारामतीकरांना माहिती असतं की आपल्या भविष्यासाठी करतोय. मी काम करताना कुणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही”, असंही पवार म्हणाले.
“मी उद्या परभणीला चाललोय, संध्याकाळी बीडला सभा आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये अशा अनेक सभा घ्याव्या लागतील. मी जी भूमिका घेतली आहे ती मला महाराष्ट्राला सांगावी लागेल. मंत्रिमंडळात मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिलेचा समावेश केला, ओबीसींचा समावेश केला. जागा मर्यादित होता. पण जास्तीत जास्त सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मलाही माहिती आहे की, मी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही”, असं अजित पवार बारामतीकरांपुढे म्हणाले. “आपण कामे करु. सुदैवाने तिजोरी आपल्या हातात आहे. आपण सगळ्या तालुक्यांचे काम करु. आपण आज जिल्हा आणि तालुक्यात अनेक विकासकामे करत आहोत”, असं अजित पवार म्हणाले.
“तुमच्या माझ्या तालुक्यातले कामे आपल्याला कार्याची आहेत. पुणे, नगर, नाशिक रेल्वे रेंगाळली आहे. त्या कामाला गती देण्याचं काम करेल. वेळ पडली तर केंद्रात जाईल पण या प्रकल्पाचा पाठपुरावा करेल. विमानतळ, मेट्रो, रस्ते या सुविधा द्यावा लागतील”, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.