पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते नगरमध्ये होते, उद्या ते पुण्यात असणार आहेत. त्यांच्या पुण्यातल्या नियोजित दौऱ्याचा सविस्तर तपशीलही आला आहे. पुणे महापालिकेकडून अमित शहांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे शाह यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई
अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे परिसर उजळून गेला आहे. उद्या महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजनही अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर 3 वाजता अमित शहांच्या उपस्थितीत भाजप बूथ कार्यकर्ता संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत, यावेळी अमित शाह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनेचा आंदोलनाच इशार
अशावेळी पुण्यातील शिवसैनिकांनी अमित शाह यांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलनाचा इशारा दिलाय. कर्नाटकातील (Karnatak) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हा इशारा दिलाय. कर्नाटकच्या घटनेविरोधात उद्या शिवसेना अमित शाहांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार आहे. बंगळुरूमधील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सेना पदाधिकारी उद्या अमित शाहांची भेट घेणार आहेत. अमित शाह यांनी वेळ दिला नाही तर आंदोलन करणार असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे. दुसरीकडे पुण्यातील शिवसैनिकांकडून जोरदार निषेध्य व्यक्त केला जातोय. पुण्यात येणाऱ्या कर्नाटकच्या बसेसवर भगव्या रंगाने छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शिवसेना पुणे असं लिहिण्यात येत आहे.